अमेरिकन ओपन टेनिस : शिस्तभंगाच्या कारवाईमुळे जोकोविच स्पर्धेबाहेर

रागाच्या भरात महिला लाइनमन्सला मारला चेंडू

न्यूयॉर्क – सर्बियाचा जागतिक मानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविच याचे अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील आव्हान त्याच्या रागामुळे घडलेल्या गैरवर्तनाने संपुष्टात आले आहे. स्पेनचा नवोदित टेनिसपटू पाब्लो कारेनो बुस्टाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात पहिल्याच सेटमध्ये जोकोविच पिछाडीवर पडल्याने त्याला स्वतःवरच राग आला.

या रागातूनच त्याने कोर्टच्या विरुद्ध दिशेला रागाच्या भरात चेंडू मारला. नेमका त्याने मारलेला फटका महिला लाइनमन्सच्या गळ्याला लागला व ती खाली पडली. त्यानंतर तिला श्‍वास घ्यायला त्रास होऊ लागला. यावेळी सामना थांबविण्यात आला. आपण रागाच्या भरात काय चूक करून बसलो याचे भान आल्यावर जोकोविचने या महिलेकडे जाऊन तिची विचारपूस केली. काही वेळानंतर ही महिला उपचारांसाठी कोर्टबाहेर गेली. मात्र, जोकोविचला हा राग चांगलाच महागात पडला.

सामनाधिकारी व रेफ्रींनी चर्चा करून कोस्टा याला विजयी घोषित केले व जोकोविचवर शिस्तभंगाची कारवाई करत त्याला स्पर्धेतून बाहेर काढले. याच सामन्यात 6-5 असा पिछाडीवर पडलेल्या जोकोविचकडून चूक झाल्यानंतर त्याला याची जाणीव झाली व त्याने महिला लाइनमनची तसेच स्पर्धेशी संबंधित रेफ्री तसेच उपस्थित व्यक्‍ती यांची माफीही मागितली. मात्र, तरीही त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून झालेल्या चुकीबद्दल दिलगिरीही व्यक्‍त केली. मात्र, त्याला खूप उशीर झाला होता.

स्पर्धेतून त्याला बाहेर काढण्यात आल्याने रॉजर फेडरर व राफेल नदाल नसलेल्या या स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्याच्या त्याच्या स्वप्नांना सुरूंग लागला. 17 वेळा ग्रॅण्डस्लॅम जिंकणारा जोकोविच आता अमेरिकेतून रिकाम्या हाताने सर्बियाला परतणार आहे. सोशल मीडियावर त्याने केलेल्या पोस्टवर अनेकांनी त्याला पाठिंबाही दिला असला तरी त्याच्या या कृतीचा निषेध करत मोठ्या खेळाडूलाही स्पर्धेतून बाहेर काढणाऱ्या रेफ्रींचे अनेकांनी अभिनंदनही केले आहे. कोणताही खेळ मोठा असतो, खेळाडू नव्हे हेच या स्पर्धेच्या आयोजकांनी कठोर निर्णय घेऊन जागतिक टेनिसलाच नाही तर जागतिक क्रीडाक्षेत्राला एक चांगला संदेश दिला आहे.

नवा विजेता मिळणार 

करोनाच्या धोक्‍यामुळे जोकोविचने या स्पर्धेतून माघार घेण्याचे सूतोवाच केले होते. मात्र, फेडरर व नदालसारखे तुल्यबळ खेळाडू स्पर्धेत खेळत नसल्याने जोकोविचने विजेतेपद मिळवत विक्रमाची नोंद करण्यासाठी या स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला होता; परंतु आता त्यालाच स्पर्धेबाहेर काढल्याने या स्पर्धेला नवा विजेता मिळणार हे स्पष्ट झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.