नवी दिल्ली – ओडिशाच्या किनाऱ्यावर आज हायपरसॉनिक तंत्रज्ञानावर आधारित एका रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या तंत्रज्ञानाचा भविष्यातील क्षेपणास्त्र, उपग्रह आणि विमान वाहतूक क्षेत्रासाठी उपयोग होऊ शकणार आहे. एसएसटीडीव्ही म्हणजेच हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डमोंस्ट्रेशन व्हेईकल असे या रॉकेटचे नाव आहे. जगात आतापर्यंत रशिया, चीन आणि अमेरिका या देशांतच अशा प्रकारची रॉकेट्स आहेत. भारत आता त्यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
या तंत्रावर आधारित क्रुझ क्षेपणास्त्र तयार करणे आता भारताला शक्य होणार आहे त्या आधारे आता चिनी क्षेपणास्त्रांनाही भारत प्रत्युत्तर देऊ शकतो. डीआरडीओकडून ही चाचणी घेण्यात आली. त्यांनी ही चाचणी ऐतिहासिक स्वरूपाची आहे असे म्हटले आहे. त्याद्वारे भारत आता अत्याधुनिक क्षेपणास्त्र निर्मितीच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी भारतीय तंत्रज्ञ आणि वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे. हायपरसॉनिक तंत्राने तयार करण्यात आलेली याने आवाजाच्या पाच पट अधिक वेगाने प्रवास करू शकतात. तथापि डीआरडीओने चाचणी घेतलेले या तंत्रावरील हे यान आवाजाच्या वेगाच्या सहा पट अधिक वेगाने प्रवास करू शकते.