चित्रपट थिएटरमध्येच रिलीज करण्याचा अक्षयचा मानस
चित्रपटरसिक ज्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत, तो अक्षयकुमार अभिनित ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट सध्या ट्विटरवर ट्रेंड करत आहे. चित्रपटाच्या पोस्टर रिलीजपासूनच याची जोरदार चर्चा असून एक तमिळ सुपरहिट चित्रपटाचा हा रिमेक आहे.
आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या अक्षयचा या चित्रपटातील लूक खूप वेगळा आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करणार नसून थिएटरमध्ये रिलीज करण्याचा अक्षयचा मानस असल्याचे बोलले जात आहे. एका इंग्रजी दैनिकाच्या बातमीनुसार अक्षयकुमारला हा चित्रपट सिनेमागृहातच प्रदर्शित करायचाय. मात्र, या वृत्ताला चित्रपटाच्या निर्मात्यांकडून कसलाही दुजोरा मिळालेला नाही.
यापूर्वी डीझनी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट अक्षयच्या वाढदिनी म्हणजेच 9 सप्टेंबरला प्रदर्शित होणार असल्याची चर्चा होती. मात्र, अद्याप या चित्रपटाचा टिझर अथवा ट्रेलरही या ओटीटीवर दिसत नाहीये. हॉट स्टारकडून याबाबत कोणतीही माहिती अजून देण्यात आलेली नाहीये. एक बातमीनुसार या चित्रपटाचे शूटिंग अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे दिवाळीत ‘लक्ष्मी बॉम्ब’ चा धमाका थिएटरमध्ये ऐकायला मिळू शकेल.