नितीन खोत यांचा शिक्षक समितीत प्रवेश
सातारा (प्रतिनिधी) – कै. काळंगे गुरुजींच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणाऱ्या खटाव तालुका शिक्षक समितीचे कार्य नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे.आजपर्यंत राबवलेल्या वेगवेगळ्या उपक्रमातून समितीने हे सिद्ध करून दाखविले आहे, असे मत महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी व्यक्त केले.
शिक्षक संघातून नितीन खोत यांनी शिक्षक समितीमध्ये प्रवेश केला. त्यावेळी कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर देवरे, सांगली जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, कोषाध्यक्ष विठ्ठल फडतरे, शिक्षक बॅंकेचे संचालक किरण यादव, चंद्रकांत मोरे, तालुकाध्यक्ष अर्जुन यमगर, सरचिटणीस नवनाथ जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. नितीन खोत यांच्यासारखा शिक्षकांमध्ये सेवाभावी वृत्तीने काम करणारा एक हिरा आम्हास गवसला आहे. या हिऱ्याला पैलू पाडून समितीमध्ये झंझावात निर्माण करण्यासाठी त्यांचा उपयोग करून घेणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
शिक्षक बॅंकेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्ट कारभाराला वेळोवेळी विरोध केला आहे. त्यामुळे यावेळी सभासद बॅंक शिक्षक समितीच्या ताब्यामध्ये देतील, असा विश्वास देवरे यांनी व्यक्त केला. शिक्षक समितीसारखी लोकशाही इतर संघटनेत नाही. इतर संघटना हुकूमशाहीने चालत असून त्याचा अनुभव घेतल्यामुळे इथून पुढे शिक्षक समितीमध्ये कोणत्याही पदाची अपेक्षा न धरता निष्ठेने काम करणार असल्याचे नितीन खोत यांनी सांगितले. सागर माने यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास सांगली प्राथमिक शिक्षक बॅंकेचे माजी चेअरमन बाळासाहेब आडके, खटाव तालुका सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष कांत फडतरे, तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे मार्गदर्शक एस. के. जाधव, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेचे माजी व्हाईस चेअरमन विश्वंभर रणनवर, माजी संचालक संजय दिडके, जयप्रकाश साबळे, माजी सरचिटणीस विजय गोरे, विजय गुरव, दिलीपराव पवार, दीपकराव घनवट, शामराव कदम, शिवनाथ लखापते, वैभव जगताप, सागर माने, किरण गोडसे, संग्राम गोसावी, सोमनाथ पाटोळे, नितीन घनवट, राजेंद्र बागल, पोपटराव माळवे, उमेश पाटील, सचिन गाढवे, किसनराव मगर, गायकवाड, विशाल देशमुख, धर्माजी इंगळे, रवींद्रकुमार पवार, संजयकुमार माने आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक विठ्ठल फडतरे यांनी केले. सूत्रसंचालन आबासाहेब जाधव यांनी केले. नवनाथ जाधव यांनी आभार मानले.