चेन्नई संघाला मोठा दिलासा
दुबई – दोन खेळाडूंसह एकूण 13 जण करोनाबाधित झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला मंगळवारी केलेल्या चाचणीत दिलासा मिळाला आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफमधील सर्व सदस्य निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे चेन्नई संघाला सराव शिबिरात सहभागी होण्यासाठी आयपीएल समितीकडून परवानगी मिळण्याची शक्यता वाढली आहे. या सर्वांची तिसरी चाचणी होणार असून त्याचा अहवालही निगेटिव्ह आला तर त्यांना लगेचच 5 सप्टेंबरपासून शिबिरात सराव करता येणार आहे. करोनाची बाधा झालेल्या दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड यांना मात्र पुढील दहा दिवस सरावाची परवानगी दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजनसिंग हा देखील स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्याने अद्याप अमिरातीला जाण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र, फाफ डू प्लेसिस व लुंगी एन्जीडी हे दोन खेळाडू अमिरातीत दाखल झाले असून त्यांना विलगीकरणात राहण्यास सांगितले आहे.
चाचण्या वीस हजार, खर्च दहा कोटी
आयपीएल स्पर्धेदरम्यान स्पर्धा समिती बीसीसीआयच्या मदतीने सर्व संघातील खेळाडू व सपोर्ट स्टाफ यांच्या सातत्याने करोना चाचण्या करणार आहे. या चाचण्या जवळपास 20 हजार होणार असून त्यासाठी बीसीसीआय तब्बल 10 कोटी रुपये खर्च करणार आहे. खेळाडूंबरोबरच सपोर्ट स्टाफ, संघ व्यवस्थापनाचे कर्मचारी, हॉटेल स्टाफ या सर्वांच्याच चाचण्या ही स्पर्धा पार पडेपर्यंत करण्यात येणार आहेत.
बायो-बबलमधून येणाऱ्यांना दिलासा
जे खेळाडू बायो-बबलमध्ये राहात होते किंवा आपापल्या देशात अशा वातावरणातच होते त्यांना अमिरातीत दाखल झाल्यानंतर पुन्हा विलगीकरणात राहावे लागणार नाही, असे अमिराती क्रिकेट संघटनेने स्पष्ट केले आहे. जे खेळाडू बायो-बबलमधून प्रवास करून अमिरातीत दाखल होतील त्यांना प्रवास केल्यानंतरही विलगीकरणात राहावे लागणार नसल्याचेही अमिराती सरकारने स्पष्ट केले आहे.
रैना अमिरातीत परतणार
दोन खेळाडूंसह एकूण 13 जण करोनाबाधित ठरल्यामुळे संपूर्ण स्पर्धेतूनच माघार घेण्याचा निर्णय घेणारा सुरेश रैनाने अमिरातीला परतण्याचे संकेत दिले आहेत. त्याच्या काकांचे दरोडेखोरांशी मुकाबला करताना निधन झाले होते. करोनाची भीती व घरात घडलेल्या प्रसंगामुळे व्यथित होत त्याने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्याचे मतपरिवर्तन झाले आहे.