नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून आजाराशी लढा देत असलेले जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी करणं शक्य नसल्यानं अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. पंतप्रधानपदाचा राजीनामा देताना शिंजो आबे भावूक झाले. आपली जबाबदारी पार पाडण्यास सक्षम नसल्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागितली. त्याचबरोबर “मी ठरवलेली उद्दिष्ट पूर्ण करण्यापूर्वीच राजीनामा द्यावा लागत असल्यानं मनाला प्रचंड वेदना होत आहेत,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे प्रकृतीच्या कारणांमुळे पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू झाल्या होत्या. दिवसोंदिवस प्रकृती खालावत चालल्याने त्याचा परिणाम सरकारवर आणि सरकारी कामावर होऊ नये यासाठी आबे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही वृत्त होते.
BREAKING: Japan’s NHK and other media say Prime Minister Shinzo Abe has expressed his intention to step down, citing his health.
— The Associated Press (@AP) August 28, 2020
अखेर आज शिंजो आबे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. दीर्घ आजारानं त्रस्त असलेले शिंजो आबे पंतप्रधान पदाचा राजीनामा देताना भावूक झाले. “दीर्घ आजारामुळे आपण पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मी जनतेची मनापासून माफी मागतो. कारण मी माझं कर्तव्य पार पाडण्यास सक्षम नाही. मी काही उद्दिष्ट निश्चित केली होती. ती पूर्ण होण्याआधीच राजीनामा द्यावा लागत असल्यानं मनाला वेदना होत आहेत,” अशा भावना आबे यांनी व्यक्त केल्या.
मागील काही दिवसांपासून आबे यांनी प्रकृतीसंदर्भातील तक्रारीमुळे दोन वेळा रुग्णालायला भेट दिल्यानंतरच त्यांच्या राजीनाम्यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं होतं. मागील बऱ्याच काळापासून आबे यांना आतड्याच्या सुजेने होणाऱ्या अल्सरचा त्रास आहे.