पुणे- करोनासाथ शहरात ओसरत असली तरी शिथील झालेले लॉकडाऊन आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बुधवार पेठ परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. त्यामुळे हा भाग करोनाचा हॉटस्पॉट ठरण्याची भिती असून या भागात कडक उपाय योजना राबविण्याची मागणी “रेड लाईट’ वस्तीतील दुकान मालकांनी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्याकडे केली आहे.
यावेळी देहविक्री करणाऱ्या महिलांना शासनाकडून मोफत अन्न-धान्य, औषधे, गरजेच्या वस्तूंचा पुरवठा केला जावा, बुधवार पेठेत निर्जुंतुकीकरण केले जावे, कोविड विषयक जागृती केली जावी, तपासणी केली जावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.
नगरसेवक विशाल धनकवडे, गजानन थरकुडे, शिवसेना संघटक गजानन पंडित, शहर इंटक उपाध्यक्ष योगेश भोकरे, महादेव कातुरे, शैलेश बढाई, (गणेश मंडळ प्रतिनिधी), दीपक हजारी, रुपेश पवार, सिध्दार्थ हेंद्रे, सत्यजित देसाई, राजेश बारणे, नितीन पंडीत, भोला वांजळे यांनी याबाबतचे निवेदन दिले. गणेश मंडळ, व्यापारी संघटना प्रतिनिधी मीतेश कापडिया, दिनेश बढाई यावेळी उपस्थित होते.
या भागात काम करणारी मंडळे, दुकानदार, संस्था शासनाला या संदर्भात मदत करतील, असे यावेळी सांगण्यात आले. हे निवेदन पालकमंत्री अजित पवार, आमदार मुक्ता टिळक, जिल्हाधिकारी राहुल देशमुख तसेच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनाही पाठविण्यात आले आहे.