नवी दिल्ली : देशात कोविड-19 शी संबंधित हॉटस्पॉट जिल्ह्यांची संख्या पंधरा दिवसांत 170 वरून 129 पर्यंत कमी झाली आहे. मात्र याच काळात करोना मुक्त अथवा ग्रीनझोन जिल्ह्यांची संख्याही 325 वरून 307 पर्यंत कमी झाली आहे. या कालावधीत “ऑरेंज झोन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हॉटस्पॉट नसलेल्या जिल्ह्यांची संख्या 207 वरून वाढून 297 इतकी झाली आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
केंद्राने 15 एप्रिल रोजी जिल्ह्यांचे तीन विभागांमध्ये वर्गीकरण केले होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असलेले जिल्हे “हॉटस्पॉट’ किंवा रेड झोन म्हटले गेले. तुलनेने कमी प्रादुर्भाव असलेले जिल्हे “ऑरेंज झोन’ किंवा “नॉन हॉटस्पॉट’ आणि आतापर्यंत करोनाचा प्रादुर्भाव नसलेले जिल्हे “ग्रीन झोन’ म्हटले गेले आहेत. जर “रेड झोन’मध्ये 28 दिवसात आणि “ऑरेंज झोन’मध्ये 14 दिवसात नवीन रुग्ण सापडला नाही, तर हे जिल्ह्ये “ग्रीन झोन’ बनतील, असे सरकारने म्हटले होते.
केंद्राने 15 एप्रिल रोजी 25 राज्यांमधील 170 जिल्हे करोनाचे हॉटस्पॉट म्हणून घोषित केले होते. यापैकी 123 जिल्हे हॉटस्पॉट आणि 47 जिल्हे हे क्लस्टर म्हणून घोषित केले गेले होते. तर 325 जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव आढळला नसल्याचेही म्हटले होते. देशातील 80 जिल्ह्यांमध्ये गेल्या 7 दिवसात आणि 47 जिल्ह्यांमध्ये 14 दिवसात एकही नवीन रुग्ण आढळला नाही, असे आरोग्य मंत्री हर्षवर्धन म्हणाले होते.
दिल्ली, महाराष्ट्र आणि गुजरात यासह नऊ राज्यांमधील 15 जिल्ह्यांना सरकारने यापूर्वीच “हाय केस लोड’ म्हटले आहे. यापैकी हैदराबाद, पुणे, जयपूर, इंदूर, अहमदाबाद, मुंबई आणि दिल्ली ही 7 ठिकाणे प्रादुर्भावाची विशेष ठळक शहरे आहेत. वडोदरा, कर्नुल, भोपाळ, जोधपूर, आग्रा, ठाणे, चेन्नई आणि सुरत ही देखील अन्य प्रमुख बाधित शहरे आहेत. देशभरात लॉकडाउन लागू होण्यापूर्वी देशातील करोनाचे रुग्ण दुपटीने वाढण्याचा कालावधी 3 ते 3.25 दिवस होता. हाच कालावधी आता 10.2 ते 10.9 दिवस इतका आहे.