पुणे – करोना संकट काळात पुणेकरांना जास्तीत जास्त ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहे. सीएसआरच्या माध्यमातून बाणेर येथे सहा मजली कोविड हॉस्पिटल उभारले आहे.
या सेंटरचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
जम्बो सेंटरनंतर सर्व सुविधायुक्त दुसरे मोठे कोविड सेंटर पुणे शहरात उभे राहिले आहे. या सेंटरच्या सज्जतेचा आढावा महापौर मोहोळ यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. हे सेंटर पुणे महापालिकेच्या माध्यमातून पंचशील फाउंडेशन, एबीआयएल फाउंडेशन, माईडस्पेस बिझनेस पार्क प्रा.लि., मालपाणी गुप संगमनेर, गेरा डेव्हलपमेंट प्रा.लि. यांच्या सहकार्यातून साकारले आहे.
याबाबत महापौर मोहोळ म्हणाले, या सेंटरमध्ये 270 ऑक्सिजन आणि 44 व्हेंटिलेटर बेड्स असे एकूण 314 बेड्सची व्यवस्था आहे. ऑक्सिजनची कमी पडू नये, म्हणून 13 हजार लिटर क्षमतेचा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टॅंक बसवला आहे. तसेच बॅकअपसाठी 16 बाय 16 ऑक्सिजन सिलिंडर, मॅनिफोल्ड त्यासाठी शेड तसेच कॉम्प्रेसर व व्हॅक्युम पंप याची व्यवस्था केली आहे.
वीजेच्या बॅकअपसाठी आयसीयु, युपीएस व जनरेटर सुविधा असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.