बीसीसीआयचे नवा गडी नवे राज्य
मुंबई – करोनाच्या धोक्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा अमिरातीत होत आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होत असून त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या खंडानंतर पुन्हा एकदा एप्रिल महिन्यात स्पर्धेचा 14 वा मोसम रंगणार आहे.
यंदा चीनविरोधातील असंतोषामुळे बीसीसीआयने व्हिवो कंपनीशी असलेला करार संपुष्टात आणला व ड्रीम 11 या कंपनीला मुख्य प्रायोजकतेचे हक्क दिले. मात्र, हे हक्क केवळ यंदाच्याच स्पर्धेसाठी असल्याचे बीसीसीआयने जाहीर केले आहे. त्यामुळे पुढील वर्षी होत असलेल्या आयपीएलसाठी पुन्हा एकदा नवा गडी नवे राज्य हेच सूत्र अंमलात आणून स्पर्धेसाठी नव्याने निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तसेच त्यावेळी करोनाचा धोका संपुष्टात आला असेल किंवा खूपच कमी झाला असेल तर स्पर्धा भारतातच आयोजित केली जाइल. अशा परिस्थितीत यंदा झालेला तोटा भरून काढण्यासाठी निविदा प्रक्रियेत मोठी बेस प्राइज लावली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
गेल्या मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार होती. मात्र, देशात करोनाचा धोका वाढल्याने ही स्पर्धा लांबणीवर टाकली गेली. आता अमिरातीत येत्या 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होत आहे. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. ही मालिका पार पडल्यानंतर भारतीय सघ मायदेशात इंग्लंडविरुद्ध मालिका खेळेल. त्यानंतर श्रीलंकेशी मालिका होणार आहे. हे वेळापत्रक पूर्ण झाले की लगेचच पुढील वर्षीची आयपीएल खेळवली जाणार आहे. म्हणजेच केवळ सहा महिन्यांच्या आतच ही स्पर्धा होणार आहे.
एका दिवसात सहप्रायोजक मिळाला
फ्युचर समूहाने सोमवारी आयपीएलशी असलेला सहप्रायोजकतेचा करार संपुष्टात आणण्यावर स्पर्धेवरही संकट निर्माण झाले होते. मात्र, एका दिवसांतच आयपीएलला अनअकादमी या कंपनीने सहप्रायोजकता देण्याचे मान्य करत हक्क मिळवले आहेत. या कंपनीने बीसीसीआयशी तीन वर्षांचा करारही केला आहे.
नाडाचे पथक दाखल
आयपीएल स्पर्धेदरम्यान सर्व संघातील खेळाडूंची उत्तेजक द्रव्यसेवन चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समितीचे (नाडा) पथक अमिरातीत दाखल झाले आहे. या पथकाच नाडाचे तीन अधिकारी व सहा डॉक्टर यांचा समावेश आहे.