30 ऑगस्टला समजणार प्रवेशाचे महाविद्यालय
अकरावी प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
यादीत 72 हजार 820 विद्यार्थ्यांचा समावेश
पुणे – इयत्ता अकरावी प्रवेशाच्या नियमित पहिल्या प्रवेश फेरीतील संभाव्य सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली. यात 72 हजार 820 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रवेशासाठी सर्वाधिक 34 हजार 71 विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेसाठी अर्ज नोंदवले. तसेच, कला शाखेसाठी केवळ 6 हजार 752 अर्ज भरण्यात आल्याने कमी पसंती मिळाली.
प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशासाठी नोंदणीची संधी देण्यात आली. यात एकूण 304 कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी करून 1 लाख 6 हजार 972 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करून दिल्या. 22 जुलैपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी सुविधा सुरू केली. त्यांतर्गत 98 हजार 946 विद्यार्थ्यांनी नोंदणी करत लॉगिन आयडी व पासवर्ड मिळविले. 1 ऑगस्टपासून प्रवेश अर्जाचा भाग-1 भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यात 81 हजार 690 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. 12 ऑगस्टपासून भाग-2 च्या माध्यमातून कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता आले. त्यात 75 हजार 410 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. प्रत्यक्षात मात्र 73 हजार 669 विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण केले आहेत. त्यातील 72 हजार 839 अर्ज लॉक करण्यात आले. 830 विद्यार्थ्यांचे अर्ज अद्यापही लॉक झालेले नाहीत.
प्रवेशाची ऑनलाइन नोंदणी केलेल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी अद्यापही महाविद्यालयांची पसंती नोंदविलेली नाही. प्रवेश क्षमतेपेक्षाही कमीच अर्ज नोंदणी झाली आहे. इन हाऊस, व्यवस्थापन, अल्पसंख्याक कोट्यांतर्गत 5 हजार 869 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले.
राज्य मंडळासह इतर विविध बोर्डांच्या विद्यार्थ्यांचे गुण कन्व्हर्ट करताना ते समान पातळीवर आणण्यात आले. त्यानुसार गुणवत्ता यादी जाहीर झाली. गुणवत्ता यादी जाहीर होताच विद्यार्थी आपापली माहिती पाहण्यात मग्न झाले. प्रत्यक्षात मिळालेले गुण व अर्जात नमूद केलेले गुण याची पडताळणी विद्यार्थ्यांना करावी लागत आहे. या गुणवत्ता यादीवर ऑनलाइन आक्षेप, हरकती नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना 25 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. याच कालावधीत शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत आक्षेपांचे संकलन करून त्यावर कार्यवाही करावी लागणार आहे.
30 ऑगस्टला विद्यार्थ्यांची पहिल्या फेरीची अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित होणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये त्याला प्रवेशासाठी मिळालेले महाविद्यालय समजणार आहे. तसेच संबंधित महाविद्यालयांनाही लॉगिनमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेशाची यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कट ऑफही संकेतस्थळावर दर्शविण्यात येणार आहेत.