शिराळा (प्रतिनिधी) – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाटा ट्रस्टच्या वतीने सुमारे 10 कोटी रुपये खर्च करुन इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय येथे अतिशय अद्ययावत यंत्र सामुग्रीसह, फ्लोरिंग, टेलिमेडिसिन, सीसीटीव्ही, व्हेंटीलेटरसह नुतनीकरण करण्यात आले आहे. या रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम टाटा ट्रस्टच्या मदतीने करण्यात आले आहे. त्यामुळे अतिशय गंभीर रुग्णांवरही उपचार करण्याची सोय येथे झाली आहे.
इस्लामपूर वासीयांसाठी उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. उपजिल्हा रुग्णालयाच्या नुतनीकरण व अद्ययावतीकरणामुळे इस्लामपुरच्या वैभवात भर पडली आहे. टाटा ट्रस्टच्या सहाय्याने इस्लामपूर येथील जिल्हा उपरुग्णालयाच्या इमारतीचे नुतनीकरण केले. या इमारतीचे लोकार्पण राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते व पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले.
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये विविध ठिकाणी रुग्णालये व्हावीत यासाठी टाटा समुहाकडे मागणी करण्यात आली होती. त्यानूसार रतन टाटा यांनी त्यास मान्यता देऊन इस्लामपूर येथे जिल्हा उपरुग्णालयाच्या इमारतीचे नुतनीकरण केले. इस्लामपूर व बुलढाणा या ठिकाणी दिलेल्या आरोग्य सुविधेबद्दल टाटा व टाटा ट्रस्ट यांचे आभार मानण्यात येत आहेत.