कमी दरात होणार करोना चाचणी
राहाता (प्रतिनिधी) – शिर्डीतील नागरीकांना अतिशय कमीदरात कोवीड टेस्ट करता यावी, यासाठी माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून करोना चाचणी नमुना संकलन केंद्राची सुरुवात करण्यात आली. अतिशय कमी दरामध्ये करोना चाचणी नमुना संकलन केंद्र शिर्डी मतदारसंघात सुरु करण्यात आले आहे.
तालुक्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून पद्मश्री डॉ. विखे पाटील फाउंडेशनने आणि शिर्डी नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात करोना चाचणी संकलन केंद्र सुरु करावे, अशी मागणी होत होती. कमी दरामध्ये या चाचणीची सुविधा निर्माण व्हावी, यासाठी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील मेमोरीअल हॉस्पिटलच्या सहकार्याने ही सुविधा शहरामध्ये सुरु झाली आहे.
या चाचणी केंद्राचे उद्घाटन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा अर्चनाताई कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभूवन, ज्ञानेश्वर गोंदकर, अभय शेळके, प्रतापराव जगताप, नगरसेवक सुजित गोंदकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले, करोनाचे संकट दिवसागणीक वाढत आहे. सर्वच नागरीकांची करोना चाचणी करण्यासाठी प्रशासनाच्या मर्यादा आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक कमीदरामध्ये करोनाची चाचणी डॉ. विखे पाटील मेमोरीअल हॉस्पीटलच्या माध्यमातून होत आहे. शिर्डी नगरपंचायतीच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरीक आणि 10 वर्षांच्या आतील वयोगटातील बालकांसाठी नगरपंचायतीने ठराव करुन सहकार्य करण्याचा निर्णय घेतल्याने सदर चाचणी 500 रुपयातच होणार असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.