कोपरगाव (प्रतिनिधी) – कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील खंडकरी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या जमिनींचे महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहीत (7/12) भुधारणा पद्धती भोगवटादार वर्ग- दोन रद्द करून भोगवटादार वर्ग- एक ची नोंद करण्यात यावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.
खंडकरी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या जमिनींचे अधिकार अभिलेख आणि नोंदवहीत (7/12) भुधारणा पद्धती भोगवटादार वर्ग- दोन रद्द करून भोगवटादार वर्ग- एक ची नोंद करण्यात यावी, अशी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील खंडकरी शेतकऱ्यांची मागील काही वर्षापासूनची मागणी होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले होते.
याबाबत या खंडकरी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य खंडकरी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधीमार्फत आमदार आशुतोष काळे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या. त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी तातडीने दखल घेवून महसूलमंत्र्यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.