प्रशासनाचे आश्वासन; खासदार बापट यांचे आंदोलन मागे
पुणे – पुण्यात उभारण्यात येणारे तात्पुरते जम्बो कोविड हॉस्पिटल 19 ऑगस्टपर्यंत उभारू आणि 21 ऑगस्टला त्याचे उद्घाटन होईल, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते; परंतु आजपर्यंत त्या जागेवर साधा तंबूही उभारण्यात आलेला नाही. हे हॉस्पिटल मुदतीत सुरू होऊ न शकल्याने बुधवारी खासदार गिरीश बापट यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, 24 ऑगस्टपासून हॉस्पिटल सुरू होईल, असे आश्वासन विभागीय आयुक्तांनी दिल्याने आंदोलन स्थगित केल्याचे खासदार बापट यांनी सांगितले.
जम्बो हॉस्पिटल उभारण्याला विलंब झाल्याच्या निषेधार्थ पक्षाच्या आमदारांना घेऊन बापट हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर आले. तेथे जिल्हा प्रशासनाने त्यांना आंदोलन न करण्याची विनंती केली. त्यामुळे आंदोलन स्थगित करून बापट यांनी प्रशासनाची चर्चेची तयारी दर्शवली. यावेळी आमदार मुक्ता टिळक, भीमराव तापकीर, विभागीय आयुक्त सौरभ राव, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे उपस्थित होते.
खासदार बापट म्हणाले की, हे हॉस्पिटल सुरू झाले की नाही, हे पाहण्यासाठी आलो आहे. उशीर का झाला हेदेखील विचारायचे होते. ही संघर्षाची वेळ नाही. गेले काही दिवस शहरात संततधार पाऊस असल्यामुळे हे हॉस्पिटल उभारणीत अनेक अडचणी येत आहे. सरकारने सांगितल्याप्रमाणे ते वेळेत पूर्ण करून पुणेकरांना उपलब्ध करून द्यावे, एवढीच आमची मागणी असल्याचे बापट यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जम्बो हॉस्पिटलची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर बोलताना बापट म्हणाले की, जम्बो हॉस्पिटल उभारण्यास उशीर झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. कारण रुग्णसंख्या कमी झाली आहे. ती कमीही झाली पाहिजे. हे हॉस्पिटल 24 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. करोनाचा प्रादुर्भाव होऊन चार महिने झाले आहेत. आता उभारणीला नाही म्हटले तर विरोध केला असे वाटेल. आमची सहकार्याची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही विरोध करणार नाही.
जम्बो हॉस्पिटल उभारणीस उशीर झाला असे मला वाटत नाही. कारण बाधित रुग्णांची टक्केवारी अद्यापही 20 टक्के आहे. ती कमी झाली पाहिजे. परंतु, ती लगेच कमी होईल असे वाटत नाही. सरकारी आणि खासगी हॉस्पटलमधील क्षमतेचा पुरेपूर वापर झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
– सौरभ राव, विभागीय आयुक्त