महापालिका व पोलीस यंत्रणांचे पुणेकरांना आवाहन
पुणे – गणेशोत्सव मंडळांनी साध्या पद्धतीने उत्सव करण्यासाठी पुढाकार घेत प्रशासनाला सहकार्य केले आहे. मात्र, साडेचार ते पाच लाख घरगुती गणपती विसर्जनासाठी नागरिक घराबाहेर पडल्याने करोनाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी मूर्तीदान किंवा पर्यावरणपुरक गणेशमूर्ती घेण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन महापालिका व पोलीस यंत्रणांनी केले आहे.
करोना आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महापौर मुरलीधर मोहोळ, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी प्रासारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, बच्चन सिंग, प्रसाद अक्कानवरू आदी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त म्हणाले, “फिरत्या हौदात गणेशमूर्ती विसर्जनाची घोषणा महापालिकेने केली असून त्याचे अन्य शहरांमधून स्वागत केले जात आहे. याबरोबरच पोलिंग बुथप्रमाणे शहरात सर्वत्र मूर्तीदान व संकलनाची व्यवस्था करावी. गणेशदर्शनाची ऑनलाइन व्यवस्था मंडळांनी केल्यास नागरिक घराबाहेर येणार नाहीत. त्यामुळे संसर्गाला अटकाव बसेल.’
डॉ. शिसवे म्हणाले, “शहरात पावणेपाच लाख घरगुती गणपती असून त्यांच्या विसर्जनाचा मुख्य प्रश्न आहे. नागरिकांनी, आपापल्या घरी, सोसायटीतच गणेशमूर्तीचे विसर्जन करावे. शहरात 3,300 सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. त्यापैकी अनेकजण एकत्र उत्सव साजरा करणार आहेत. केवळ 30 ते 35 टक्के मंडळांनाच छोटा मंडप टाकण्याची परवानगी द्यावी लागण्याची शक्यता आहे. याबाबत स्थानिक पातळीवर पोलीस, महापालिका चर्चा करत आहे.’
नागरिकांनी यंदा घराच्या गणेश मूर्तीचे घरीच विसर्जन करावे. याबरोबरच मूर्तीदानासाठी महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत व्यवस्था केली जाईल. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य द्यावे.
– मुरलीधर मोहोळ, महापौर