तक्रारींत तथ्य : पाच दिवसांत 50 बिलांची तपासणी
पालिकेने केलेल्या तपासणीत वाचले 29 लाख रुपये
पुणे – करोनाबाधितांवर खासगी रुग्णालये जादा बिल आकारत असल्याच्या तक्रारींत तथ्य असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने निश्चित केलेल्या कोविड हॉस्पिटलमधील 50 बिलांच्या तपासणीत सुमारे 36 बिले जादा दराने आकारल्याचे समोर आले आहे. या तपासणीमुळे सुमारे 29 लाख 24 हजार रुपये कमी झाले आहेत.
ही बिले तपासण्यासाठी महापालिकेने लेखा परीक्षक नेमले असून, अवघ्या पाच दिवसांत ही बाब समोर आली आहे. त्यामुळे रुग्णालयांनी यापूर्वीही आकारलेल्या बिलांची तपासणी करण्याची मागणी होऊ लागली आहे. महापालिकेने शहरातील सुमारे 25 हॉस्पीटल कोविड हॉस्पिटल म्हणून ताब्यात घेतली आहेत. यामध्ये शासनाने ठरवलेल्या दरांनुसार उपचाराची बिले आकारणे आवश्यक असताना, प्रत्यक्षात मनमानी पद्धतीने बिले आकारल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या प्रकारांची गंभीर दखल घेत ज्या हॉस्पिटल्सची बिले दीड लाखांपेक्षा अधिक आहेत, त्यांची तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.
त्यानुसार महापालिकेने पाच दिवसांपूर्वी लेखापालांची नियुक्ती केली होती. या लेखापालांनी सुमारे 1 कोटी 18 लाख 43 हजार रुपयांच्या 50 बिलांची तपासणी केली असून, त्यात सुमारे 36 बिले वाढीव दराने आल्याचे समोर आले आहे. ही बिले कमी करून 89 लाख 19 हजार 764 रुपयांची बिले अंतिम करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली.