अयोध्या: श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांना गुरुवारी अयोध्येत कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचा मणिरामदास छावणी आश्रमाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे, तसेच इतर साधू-संतांना होम क्वारंटीन राहण्याची व्यवस्था केली जात आहे.
तसेच ज्यांना लक्षणे दिसत आहेत. त्यांनी तात्काळ आम्हाला माहिती द्यावी जेणेकरून टेस्ट करता येईल. गेल्या दहा दिवसांत महंत नृत्य गोपाल दास यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी खूप लांब आहे, असे आवाहन आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूमीपूजन आणि श्री रामजन्मभूमी मंदिराच्या शिलान्यास समारंभात प्रमुख अतिथी होते. सोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील होते. यावेळी दोघांनीही मास्क परिधान केले होते.
या समारंभात पर्यटनमंत्री प्रह्लादसिंग पटेल, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, मुख्य सचिव आर के तिवारी, प्रधान सचिव गृह एके अवस्थी आणि विश्वस्त सरचिटणीस चंपत राय यांच्यासह शेकडो साधू-संत, यांच्यासह राम मंदिरासाठी दान देण्यासाठी आलेल्या आमदार – सामाजिक कार्यकर्ते सहभागी होते.
या अगोदर महंत नृत्यगोपाल दास यांना भेटण्यासाठी आणि राम मंदिराच्या बांधकामासाठी दान करण्यासाठी रोज मोठ्या संख्येने लोक आले होते.
महंत नृत्य गोपाळ दास यांच्या प्रकृतीच्या सुरक्षेसाठी अयोध्येत धार्मिक विधी सुरू होते
महंत नृत्यगोपाल दास कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी अयोध्यामध्ये धार्मिक विधी सुरू झाले आहेत. त्यांच्या प्रकृतीसाठी, तीन दिवसीय मृत्युंजय महामंत्र विशेष यज्ञ आहुति देण्यात येत आहे. तसेच महंत नृत्य गोपाल दास 11 ऑगस्टला कृष्ण जन्मोत्सवात सहभागी होण्यासाठी मथुरेला सुद्धा गेले होते.
त्याचबरोबर अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनीही त्यांच्या प्रकृतीची प्रार्थना केली आहे. त्यांनी महंत नृत्यगोपाल दास यांचे गुरु म्हणून वर्णन केले आणि सांगितले की ते स्वत: हनुमानाजवळ महंत नृत्यगोपाल दास यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतील. शनिवारी मोठ्या हनुमान मंदिरात सुंदरकांड पठण होईल. राम मंदिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते व्हावे, अशी सर्व संतांची इच्छा असल्याचे महंत नरेंद्र गिरी म्हणाले.