बीजिंग : चीनच्या जिंगझोऊ शहरात वयोवृद्ध महिला कोरोनामुक्त झाली परंतु, सहा महिन्यांनी तिला पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 9 ऑगस्ट रोजी दुसऱ्यांदा तिचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या विषाणूबाबतचा धोका आणखी वाढला असल्याचे म्हटले जात आहे. याआधी 8 फेब्रुवारी रोजी तिला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी मध्येच ती पूर्णपणे ठिक होऊन घरी परतली होती. महिलेला क्वॉरंटाईन करण्यात आले आहे आणि तिच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, असेच एक प्रकरण महिन्याभरापूर्वी इज्राइलमध्ये समोर आले होते. एक डॉक्टर कोरोनामुक्त झाल्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. दरम्यान, सध्या तरी दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होण्याची वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित प्रकरणे आढळली नाहीत. विशेषतज्ज्ञांनी चुकीचे परीक्षण किंवा दुसऱ्या आजारामुळे असे झाले असल्याचे सांगितले आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की, ठिक झाल्यानंतरही कोरोना शरीरातील काही भागांत राहतो.
अमेरिकेतील 82 वर्षांच्या व्यक्तीला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयाच दाखल करण्यात आले होते. यासंदर्भात अमेरिकेत ‘अ केस रिपोर्ट ऑफ पॉसिबल नोवल कोरोना वायरस 2019 रीइनफेक्शन’ नावाचा रिपोर्ट पब्लिश करण्यात आले होते. व्यक्तीला एक आठवडा ताप येत होता. त्यामुळे त्या व्यक्तीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांनंतर कोरोना चाचणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आणि संबंधित व्यक्तीची प्रकृती आणखी खालावली.
व्हेंटिलेटरवर बरेच दिवस राहिल्यानंतर डॉक्टरांना संबंधित व्यक्तीचा जीव वाचवण्यात यश आले. परंतु, काही वेळानंतर ते पुन्हा आजारी पडले. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्याआधी त्यांची दोनदा कोरोना चाचणी करण्यात आली होती. परंतु, ती नेगेटिव्ह आली होती. दुसऱ्यांदा त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि ते पूर्णपणे ठिक झाले. मेडिक्सने द अमेरिकन जर्नल ऑफ इमरजन्सी मेडिसिनमध्ये चर्चा केली असता, एखाद्या व्यक्तीची कोरोना चाचणी नेगेटिव्ह आली आणि त्यानंतर ती पुन्हा आजारी पडली हे कसे शक्य आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.