नागरिकांनो, घरीच तयार करा शाडू मातीची गणेशमूर्ती

पर्यावरणपूरक गणेशोत्सव : दैनिक "प्रभात'च्या संकेतस्थळावर मोफत प्रात्यक्षिक

पुणे  -“पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीचा गणपती बसवा,’ असे आवाहन सातत्याने केले जाते. पण, विकत आणलेल्या मूर्तीपेक्षा स्वत: घडवलेली मूर्ती ही समाधान देते. पण, ही मूर्ती नेमकी बनवायची कशी? याचे उत्तर मिळेल दैनिक “प्रभात’च्या संकेतस्थळावर. शाडू मातीची मूर्ती कशी बनवावी, यासाठी मार्गदर्शनपर व्हिडिओ येथे पाहायला मिळणार आहे. 

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी दै. “प्रभात’तर्फे “ग्रीन गणेशा’ या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. यातून जास्तीत नागरिक आणि विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देत त्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रोत्साहित केले जात आहे. यंदाही या उपक्रमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यातील सर्वांत महत्त्वाचा उपक्रम म्हणजे घरच्या घरी शाडू मातीची मूर्ती बनवण्याची कार्यशाळा. यासाठी दै. “प्रभात’च्या अधिकृत संकेतस्थळावर दि.17 ऑगस्टपासून मार्गदर्शनपर व्हिडिओ पाहायला मिळेल. याद्वारे तुम्ही गणेशमूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण घेऊ शकाल. यासाठी मूर्तीकार नितीन ठाकरे हे मार्गदर्शन करतील. मूर्ती बनविण्यासाठी शाडू माती, लाकडी पाट, ब्रश, रुमाल, पाण्यासाठी भांडे आणि रंग यांची आवश्‍यकता असेल.

दैनिक “प्रभात’ कार्यालयात शाडू माती उपलब्ध
शाडूच्या मातीचा गणपती बनवण्यासाठी माती कुठून आणणार, असा प्रश्‍न तुम्हालाही पडलाय का? मग तुमच्या प्रश्‍नाचे उत्तर “प्रभात’कडे आहे. इच्छुक नागरिकांसाठी “प्रभात’ कार्यालयात शाडू माती उपलब्ध करण्यात आली आहे. ही माती सशुल्क मिळेल. त्यासाठी नागरिकांनी दै. “प्रभात’च्या नारायण पेठ येथील कार्यालयात संपर्क साधावा.

असे व्हा उपक्रमात सहभागी : 

शालेय विद्यार्थ्यांसाठी
या उपक्रमात सहभागी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी दि.17 ऑगस्ट रोजी शाळेच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

इतर इच्छुक नागरिकांसाठी
शाडू मातीची मूर्ती कशी बनवावी याचा व्हिडिओ दि. 17 ऑगस्टपासून दैनिक “प्रभात’च्या www.dainikprabhat.com या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.