पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारात असलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकूण 27 हजार 787 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात प्रवेशाची क्षमता 5 हजार 653 इतकी आहे. त्यामुळे विद्यापीठातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेची अभ्यासपूर्वक तयारी करावी लागणार आहे.
विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमासह अनेक पदवी व पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा समावेश आहे. त्यासाठी 10 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गुणवत्तेचा कस लागणार आहे.
पदवी व पदव्युत्तरची प्रवेश क्षमता 3 हजार 353 इतकी आहे. त्यासाठी अर्जाची संख्या 22 हजार 467 इतकी आहे. पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता 2300 असून, त्यासाठी 2650 विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव उत्तम चव्हाण यांनी दिली. दरम्यान, ऑनलाईन अर्जाची मुदत संपली. त्यानंतर आता पदवी व पदव्युत्तरसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाते. त्यानंतर संबंधित विभागाकडून प्रवेश दिले जाणार आहे.
पदवीसाठी 16 ऑगस्टला प्रवेश परीक्षा
बॅचरल ऑफ व्होकेशनल (बी.व्होक), बीए लिबरल आर्टस्, संगीत, नृत्य, नाटक, बी.टेक एव्हिएशनसह अन्य पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यापीठातर्फे येत्या 16 ऑगस्ट रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांना ऑनलाईनद्वारे घरी बसून लॅपटॉप अथवा संगणकाद्वारे देता येणार असल्याची सुविधा आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.