शिरूर : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मुगाच्या पिकाची आवक होऊ लागली असून मुगाला पाच हजार ते साडेसहा हजार एवढा उच्चांकी दर मिळत असल्याचे बाजार समितीचे संचालक प्रवीण चोरडिया यांनी सांगितले.
सध्या पाऊस वेळेवर झाले ने मुगाची मोठ्या प्रमाणात पेरणी झालेली असून, मुगाच्या पिकाची आवक आता शिरूर बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. आज 11 ऑगस्ट रोजी सुमारे साडेचारशे क्विंटल मुगाची आवक शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात झाली असून मोठ्या प्रमाणात शेतकरी मुगाचे पीक घेऊन बाजार समिती येथे येत आहे.
यंदा मुगाला बाजार भाव चांगला मिळण्याची शक्यता असून सध्या पाच हजार ते साडेसहा हजार एवढा बाजारभाव मिळत असून, यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात मुगाची आवक होऊन मुगाच्या पिकांमध्ये मुख्य यार्ड शिरूर व उपबाजार तळेगाव ढमढेरे येथे सुमारे वीस ते पंचवीस कोटीची उलाढाल शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणार असल्याचे बाजार समिती संचालक प्रवीण चोरडिया यांनी सांगून शेतकऱ्याला त्याच्या मुगाच्या पिकाला बाजार भाव चांगला मिळावा यासाठी बाजार समिती सभापती शंकर जांभळकर व उपसभापती विकास शिवले, सचिव अनिल ढोकले, सर्व संचालक मंडळ व कर्मचारी हे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे यंदा शेतकऱ्याला त्याच्या मुगाच्या पिकाला चांगला बाजार भाव मिळणार आहे.
शिरूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुगाची आवक चांगल्या प्रकारे होत असून शेतकऱ्यांनी मूग विक्रीसाठी येताना आणताना वाळवून व चाळणी करून विकण्यासाठी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आणावे, त्यामुळे मुगाच्या पिकाला आणखी चांगला बाजार भाव मिळण्यास मदत होणार आहे.
-शशिकांत दसगुडे (माजी सभापती शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती)