जेऊरमधील पहिला बाधित आणि पहिला मृत्यूही त्यांचाच ठरला
वाल्हे, दि. 8 (वार्ताहर) – जेऊर (ता. पुरंदर) येथील करोनाबाधित 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक करोनामुक्त होवून चार दिवसांपूर्वीच घरी परतला होता. मात्र, शुक्रवारी (दि. 7) रात्री उशीरा त्यांचा करोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली. दरम्यान, गावातील पहिले बाधित आणि पहिला मृत्यू हा त्यांचाच ठरला आहे.
संबंधित ज्येष्ठास नुकतेच घरी सोडल्यानंतर त्यांना क्वारंटाइन ठेवण्यात आले होते. मात्र, अचानक त्यांना पुन्हा श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने सासवड येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधी गावामध्ये घरामधील मोजक्या लोकांच्या उपस्थित, पीपीई किटचा वापर करीत करण्यात आल्याचे सरपंच प्रतीक धुमाळ यांनी सांगितले.
ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना संबिधित रूग्णाच्या संपर्कातील नातेवाईक आणि अंत्यविधीला उपस्थित राहिलेल्यांची तपासणी करावी लागणार असल्याचे वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत आंधळे व पर्यवेक्षक राजेंद्र दळवी यांनी सांगितले. या घटनेनंतर गावात सर्वत्र निर्जुंतीकरण येणार असून, गावात प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे. आरोग्य कर्मचारी आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तपासणी सुरू केल्याची माहिती सरपंच धुमाळ यांनी दिली.