मांडवगण फराटा – शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील मांडवगण फाराटा येथील 28 वर्षीय तरुण व सादलगाव येथील एका 65 वर्षीय महिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. मंजूषा सातपुते-इसवे यांनी दिली.
मांडवगण फराटा येथील एका तरुणाने वाघोली येथे स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. यात त्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या तरुणाच्या संपर्कात आलेल्या 16 जणांना क्वारटांइन करण्यात आले आहे. तर सादलगाव येथील बाधित महिलेचा करोना पॉझिटिव्ह आला असून या महिलेच्या संपर्कात 7 जण आले आहेत.
शिरूरच्या पूर्व भागात दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना नागरिक अजूनही करोनाला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. नागरिक मास्क न घालता खुलेआम फिरताना दिसत आहेत. आजपर्यंत शिरूरच्या पूर्व भागातील शिरसगाव काटा, आंधळगाव, वडगाव रासाई, तांदळी, इनामगाव या 5 गावांत करोनाचा प्रवेश झालेला नसल्याने येथे अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.