अयोध्या – अयोध्येतील रामलल्लाचे वेश गेल्या 35 वर्षांपासून शंकरलाल आणि भगवतलाल पहादी शिवत आहेत. त्यांच्या या भक्तिभावामुळेच पाच ऑगस्टला भूमिपूजनावेळी रामलल्लाचे वेश शिवण्याचे काम त्यांनाच देण्यात आले आहे. रामलल्लाच्या त्या दिवशीच्या कपड्यांवर नवरत्ने सोन्याच्या धाग्यांनी लावली आहेत.
त्यांचे दुकान शहराच्या बडी कुटिया भागात आहे. त्यांच्या वडिलांच्या म्हणजे बाबूलाल या नावाने ते प्रसिद्ध आहे. तेथेच ही भावंडे फक्त दैवतांचे वेश शिवतात.
रामल्लाचे वेश माझे वडील कै. बाबूलाल हे 1985 पासून शिवत होते. आमचे शिलाई मशीन घेऊन ते तिथे जात असत. मी आणि माझा लहान भाऊ यांना सोबत घेऊन ते हा वेश शिवत असत, असे शंकरलाल यांनी सांगितले. आम्ही तिघे रामाचे कपडे शिवतो. ईश्वरासमोरच आम्ही कपड्यांना टाके घालतो. तेव्हापासून आम्ही बाहेर जाऊन काम करण्याची पद्धत सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
राममंदिराच्या भव्य भूमिपूजन सोहळ्यासाठी कपड्यांचे दोन जोड शिवण्यात येत आहेत. एक हिरव्या रंगाचा आहे. तर दुसरा भगव्या रंगाचा आहे. त्यासाठी खास मखमली कापड वापरण्यात आले आहे. काही झाले ते बालक असणाऱ्या रामलल्लाचे कपडे आहेत. त्या दिवसाचे औचित्य म्हणून हिरव्या रंगाचे कपडे तर पावित्र्याचे प्रतीक म्हणून भगव्या रंगाचे कपडे बनवले आहेत, असे शंकरलाल म्हणाले.
नवरत्ने अन् सोन्याचे धागे
बुधवारी प्रथमत: रामलल्लाला हिरवे कपडे परिधान केले जातील. त्यानंतर भगवे कपडे घालतील. या विशेष कपड्यांसाठी नऊ रत्ने सोन्याच्या धाग्याने लावण्यात आली आहेत. रविवारी शिंप्याकडून हे वेश देण्यात आले आहेत, असे आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले.
रामलल्लाच्या कपड्यांचा रोजचा रंग
सोमवार -पांढरा
मंगळवार -लाल
बुधवार -हिरवा
गरूवार -पिवळा
शुक्रवार -क्रिम
शनिवार -निळा
रविवार -गुलाबी
केवळ रामाचेच नाही तर लक्ष्मण, भरत शत्रुघ्न, हनुमान आणि शाळीग्राम यांचेही कपडे शिवले जातात. यापूर्वी 11 मीटर कापड या कपड्यांसाठी लगत होते. मात्र कार्यक्रमासाठी 17 मीटर कापड लागले. एकदा मंदिर उभे राहिल्यानंतर किती कापड लागेल याची कल्पना नाही.
माझा जन्म अयोध्येत झाला आणि रामलल्लाचे कपडे शिवण्याचे काम मला मिळाले यापेक्षा दुसरा कोणता आनंद असू शकतो
शंकरलाल पहादी
रामलल्लाचे कपडे शिवणारे