वॉशिंग्टन – वटवाघळांमुळेच जगभरात करोनाचा धोका पसरल्याचे सांगितले जात आहे. याला पुष्टी म्हणून येथिल काही संशोधकांनी करोनाचा विषाणू वटवाघळांमध्ये चारपेक्षाही जास्त दशकांपासून होता असा दावा केला आहे.
चीनमधून जगभरात पसरलेला करोनाचा विषाणू सध्या थैमान घालत आहे. यावर अद्याप रामबाण उपाय ठरेल अशी लस किंवा औषध तयार झालेले नाही. त्यासाठी हा विषाणू शरिरात अजुनही जीवंत राहत असलेल्या वटवाघळांच्या रक्त तसेच पेशींमध्येच त्याचा उपायही सापडेल असा विश्वासही येथिल पेन्सिलवेनिया स्टेट यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी व्यक्त केला आहे.
चीनमध्ये तसेच जगभरात झालेल्या विविध संशोधनातून करोनाचा विषाणू हॉर्सशू या प्रजातीच्या वटवाघळांमध्ये आढळून आला आहे. या विषाणूचे अस्तित्व या वटवाघूळांमध्ये जवळपास चार दशकांपासूनच होते, असे या संशोधनातून सांगण्यात आले आहे.
वटवाघळांमध्ये केवळ करोनाचा नव्हे तर अन्य विषाणूंचे वास्तव्यही असते. मात्र, त्यांना त्याचा त्रास कसा झाला नाही यावर सध्या संशोधन सुरू आहे. या संशोधनापूर्वी करोनाचा विषाणू चीनने प्रयोगशाळेतच तयार केला असे बोलले जात होते.
मात्र, त्यावरही या संशोधकांनी शंका उपस्थित केली आहे. या वटवाघळांचा आणखी अभ्यास करण्याची गरज असून त्यानंतरच करोनावर उत्तर मिळेल, असेही मत या संशोधकांनी व्यक्त केले आहे.