हल्ल्यात 29 जण ठार आणि 50 हून अधिक जखमी
अफगाणिस्तान (नांगरहार) – अफगाणिस्तानच्या पूर्व नांगरहर प्रांतातील तुरूंगावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 29 जणांचा मृत्यू झाला आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटाच्या दहशतवाद्यांनी रविवारी तुरूंगावर हल्ला केला. या हल्ल्यात 29 जण ठार आणि 50 हून अधिक जखमी झाले. हल्ल्यानंतर झालेली चकमक सुमारे 18 तास चालली. या तुरूंगात या दहशतवादी संघटनेचे शेकडो सदस्य बंदीस्त आहेत. अशी माहिती एका स्थानिक अधिकाऱ्याने दिली.
रविवारी सायंकाळी हा हल्ला करण्यात आला होता आणि हल्यानंतर सुरू झालेल्या चकमकीत आतापर्यंत जवळपास 50 जण जखमी झाले आहेत. नांगरहार प्रांताचे राज्यपाल यांचे प्रवक्ते अताउल्लाह खोग्यानी सांगितले की, या हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत आतापर्यंत तीन हल्लेखोर ठार झाले आहेत. सोमवारी ही चकमक सुरू होती आणि तुरूंग आवारात थांबून थांबून गोळीबार सुरू होता.
मृतांमध्ये कारागृहातील काही कैद्यांव्यतिरिक्त सामान्य नागरिक, तुरूंगातील सुरक्षा रक्षक आणि अफगाण सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश आहे. नांगरहारची राजधानी जलालाबाद येथील कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ आत्मघातकी कार बॉम्बस्फोटाने या हल्ल्यास सुरूवात झाली.
त्यानंतर अनेक हल्लेखोरांनी अफगाण सुरक्षा दलावर गोळीबार केला. हल्लेखोरांची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. या हल्ल्याचा जबाबदारी खोरासन प्रांतातील इस्लामिक स्टेट गटाशी संबंधित असलेल्या संघटनेने घेतली आहे. या दहशतवादी संघटनेचे मुख्यालय नांगरहार प्रांतात आहे.
एका प्रांतीय अधिकाऱ्याने सांगितले की, हल्ल्यादरम्यान बरेच कैदी तुरुंगातून पळून गेले. तुरूंगावर हल्ल्याचे कोणतेही कारण अद्याप स्पष्ट नाही. कारागृहात 1 हजार 500 कैदी आहेत,ज्यांपैकी बरेच कैदी आयएसशी संबंधित आहे. आतापर्यंत हे स्पष्ट झाले नाही की या तुरूंगात कोणी विशेष कैदी तर बंदी नाहीत ना, ज्यांना सोडवण्याकरिता हा हल्ला करण्यात आला असावा.
दरम्यान, अफगाणच्या गुप्तहेर एजन्सीने एका दिवसापूर्वीच बातमी दिली होती की, अफगाण स्पेशल फोर्सने जलालाबाद जवळ आयएसच्या एका दहशतवादी कमांडरचा खात्मा केला आहे.
तालिबानचे राजकीय प्रवक्ते सुहेल शाहीन याने सांगितले की, त्यांच्या गटाचा जलालाबाद तुरूंग हल्ल्यात सहभाग नव्हता. अमेरिकेने फेब्रुवारीमध्ये तालिबानशी शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे. ते म्हणाले की, आमची युद्धबंदी सुरू आहे आणि आम्ही देशात कुठेही अशा हल्ल्यात सामील नाही. ईदच्या दृष्टीने तालिबानाने शुक्रवारपासून तीन दिवसांचा संघर्षविराम जाहीर केला होता.