महाबळेश्वर (प्रतिनिधी) – गादळवाडी येथील सारीच्या रूग्णाचे आज निधन झाले. तर करोना रुग्णांच्या संख्येने महाबळेश्वर तालुक्यात शंभरी पार केली आहे.
महाबळेश्वरपासून दोन किलोमीटरवरील गादळवाडी भागातील एका व्यक्तीचे सारीने निधन झाले. या व्यक्तीला सारीच्या उपचारासाठी सातारा येथील रूग्णालयात नेण्यात आले होते. परंतु, सातारा येथे उपचारापूर्वीच या व्यक्तीचे निधन झाले. पालिकेच्या पथकाच्या मदतीने या व्यक्तीवर काही मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत दफन विधी करण्यात आला. महाबळेश्वर येथील रांजणवाडी व पाचगणीजवळील गोडवली या दोन्ही प्रतिबंधित क्षेत्रात करोना रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत चालली आहे. महाबळेश्वर तालुक्याने आज करोना रूग्णांची शंभरी पार केली.
गोडवली येथे करोनाचे 38 रुग्ण आहेत तर रांजणवाडी येथे 10 रुग्ण आहेत. एकूण रुग्णसंख्येपैकी 39 रूग्णांवर महाबळेश्वर, पाचगणी येथे उपचार सुरू आहेत. आजअखेर 60 जण करोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत दोन व्यक्तींचे निधन झाले असून एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली होती. पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी शहरात फेरफटका मारला. त्यांनी सुभाष चौक, बाजारपेठ, गणेश पेठ, गवळी आळी, पालिका कर्मचारी सोसायटी आदी दाट लोकवस्तीच्या भागात पायी फिरून पाहणी केली. तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांनी आज प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या गोडवली गावाची पाहणी केली. यावेळी गटविकास अधिकारी नारायण घोलप, जिल्हा बॅकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार आदी उपस्थित होते.