नवी दिल्ली – ड्युटीवर वेळवर हजर न झाल्याने दिल्ली पोलीस दलातील 36 पोलीस कर्मचाऱ्यांना आज निलंबित करण्यात आले. ईद निमित्त या पोलीस कर्मचाऱ्यांना उत्तर पूर्व दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्त करण्यात आले होते; पण तेथे ते ज्या वेळी उपस्थित राहणे अपेक्षित होते ती जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
एका अधिकाऱ्याने सांगितलेल्या माहितीनुसार या पोलीस कर्मचाऱ्यांना साडेपाच वाजेपर्यंत संबंधित जागेवर हजर राहण्याची सूचना करण्यात आली होती; पण त्यांनी साडेसहापर्यंत हजर झाल्याचे रिपोर्टिंग केले नाही. त्यामुळे ही कारवाई करणे भाग पडले असे पोलीस उपायुक्त विजयंता आर्य यांनी सांगितले.
केवळ वेळवर उपस्थित न राहण्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी निलंबित केले जाण्याची अलीकडच्या काळातील हा पहिलाच प्रकार आहे.