शिवाजीनगर-गावठाण येथील घटना, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
पुणे (प्रतिनिधी) : शिवाजीनगर येथील गावठाण परिसरातील एका बंद सदनिकेत पती-पत्नीचा मृतदेह आढळून आला आहे. शनिवारी सांयकाळी पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संभाजी बापू शिंदे (वय.75) व शोभा संभाजी शिंदे (वय.70) अशी मृतांची नावे आहेत.
मागील पाच सहा दिवसापुर्वी ही घटना घडली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र दोघांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणातून झाला हे मात्र अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिासांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिंदे दाम्पत्याला मुलबाळ नव्हते, त्यामुळे ते दोघेच गावठाण परिसरातील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहत होते. दहा पंधरा दिवसाला त्यांचे नातेवाईक त्यांच्याकडे चक्कर मारत असत, तसेच फोनवर त्यांच्याशी संवाद साधत होते. मात्र मागील आठ दिवसापासून त्यांचा फोन लागत नव्हता त्यामुळे शोभा शिंदे यांच्या बहिणीची मुलगी त्यांच्यासाठी जेवनाचा डब्बा घेऊन भेटण्यासाठी आली होती. परंतू अनेकदा दरवाजा वाजवून देखील कोणताच प्रतिसाद मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर शेजाऱ्यांना बोलावून दरवाजा तोडला असता, दोघेही मृतअवस्थेत मिळून आले.