ग्रामीण दहशतवादविरोधी पथक व भिगवण पोलिसांची कारवाई : इंदापूरला बीड जिल्ह्याचे कनेक्शन
भिगवण- पुणे ग्रामीण दहशतवादी पथक आणि भिगवण पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तीन सराईतासह 4 गावठी पिस्तूल आणि 8 काडतूसे ताब्यात घेण्यात आली. गेल्या चार महिन्यांतील पथकाची ही सर्वांत मोठी कारवाई आहे. त्यामुळे गुन्हेगारी विश्वातील रॅकेटची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरली आहे. भिगवण पोलीस स्टेशनमध्ये तिघांवर बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
तुषार विठ्ठल चितळे (वय 19, रा. सुलेमान देवळा, ता. आष्टी, जि. बीड), अकिल ऊर्फ भागुजी भारत बरडे (वय 26, रा. चोभा निमगांव, ता. आष्टी, जि. बीड), कबीर महमद सय्यद (वय 34, रा. सुंदरनगर, कडा, जि. बीड), असे अटकेतील तीन सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
भिगवणचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे पथकासह भिगवण परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी दहशतवाद विरोधी पथकाचे महेंद्र कोरवी यांना भिगवण एसटी स्टॅड परिसरामध्ये तीनजण गावठी पिस्तूल घेऊन येणार आहेत, अशी बातमी मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने भिगवण पोलिसांच्या मदतीने तीनजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 4 गावठी पिस्तूल व 8 जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती नारायण शिरगावकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहायक फौजदार सुनील ढगारे, राजू पवार, रज्जाक शेख, जितेंद्र शेवाळे, विश्वास खरात, पोलीस हवालदार राजेंद्र मिरगे, ईश्वर जाधव, विशाल भोरडे, किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, लक्ष्मण राऊत, मोसीन शेख, अरुण पवार, पोलीस नाईक गोरख पवार, इकबाल पठाण यांच्या पथकाने केली.
- रॅकेटकडून कसून चौकशी
भिगवण येथे तीन सराईत गुन्हेगार पिस्तूल, काडतुसांसह गजाआड झाले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील तिघांचे कनेक्शन पुणे जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले आहे. औद्योगिक वसाहतीचा टापू अशांत असल्यामुळे या गुन्हेगारांचे धागेदोरे हे खेड, शिरूर, बारामती तालुक्यात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दहशतवाद विरोधी पथकाने कसून चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे पथकाला सूत्रधारांपर्यंत पोहोचता येणार आहे.