हिरामण शेवाळे ः भोर तालुक्यात खरीप हंगामात विमा भरण्याची मुदत 31 जुलै
विसगाव खोरे- खरीप हंगामातील भात, नाचणी, ज्वारी, भुईमुग या चार पिकांचा विमा भोर तालुक्यांतील शेतकऱ्यांना काढता येणार असून, खरीप पीक विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यंदाच्या खरीप हंगामापासून पुढील 3 वर्षांसाठी पीक विमा योजना जाहीर केली आहे. एचडीएफसी ग्रो इन्शुरन्स कंपनीकडून भात पिकासाठी 910 रुपये, ज्वारीसाठी 500 रुपये, नाचणीसाठी 400 रुपये आणि भुईमुगासाठी 700 रुपये हेक्टरी विमा हप्ता आहे, अशी माहिती भोर तालुका कृषी अधिकारी हिरामण शेवाळे यांनी दिली.
पावसाची अनियमितता, कमी-अधिक प्रमाण, हवामानात अचानक होणारा बदल, बियाणांची कमी उगवण क्षमता यांमुळे शेती उत्पादनात घट होत आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, तसेच काढणीनंतर पिकाचे झालेले नुकसान, चक्रीवादळे, भूस्खलन, बिगरमोसमी पाऊस, अवेळी लागणारी आग, चक्रीवादळे, पूर, जंगली प्राणी, कीडरोग आदी स्थानिक पातळीवरील आपत्तींपासूनच्या संरक्षणासाठी हा विमा उपलब्ध करण्यात आला आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती याबाबींकरीता विम्याचे संरक्षण मिळणार आहे. सरकारच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, संकटापासून सुरक्षा मिळावी यासाठी शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजना आमलात आली आहे, असेही हिरामण शेवाळे यांनी सांगितले.
- महा-ई सेवा केंद्रावरून अर्ज करावेत
खरीप हंगाम 2020-21 पासुन योजनेत सहभागी होण्यासाठी विमा प्रस्ताव बॅंकेस सादर करतेना सर्व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी कागदपत्रामध्ये आधार कार्ड, बॅंक पासबुक, 7/12, 8-अ उतारा ही कागदपत्र आवश्यक आहेत. अर्ज भरण्यासाठी बॅंकामध्ये होणारी गर्दी टाळता यावी आजण शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणून या हंगामापासून गावपातळीवर अधिकची सुविधा म्हणुन आपले सरकार सेवा केंद्राद्वारे म्हणजेच महा-ई सेवा केंद्रावरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. येथे विमा अर्ज करण्याची सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे.