धोनीचा सहभाग लक्षवेधी, बीसीसीआयच्या निर्णयाची प्रतीक्षा
मुंबई – आयसीसीने ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेबाबत निर्णय जाहीर केल्यानंतर आता बीसीसीआयने आयपीएलबाबत निर्णय जाहीर केला की, आयपीएल समिती आयोजनाबाबत तयारी सुरू करणार आहे, असे संकेत समितीच्या एका सूत्राने दिले आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या मैदानावरील परतीचा क्षण लक्षवेधी ठरणार आहे.
सोमवारी आयसीसीने टी-20 विश्वकरंडक स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्यावर आयपीएलचा मार्ग मोकळा झाला होता. करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने ही स्पर्धा बीसीसीआयने निश्चित केलेल्या कालावधीत भारतात होण्याची शक्यता धूसर असल्याने अमिरातीचाच पर्याय निश्चित मानला जात आहे.
या स्पर्धेचे आयोजन अमिरातीत होणार हे निश्चित मानले जात असल्याने संघ मालकांनीही आपल्या खेळाडूंना स्वतंत्र विमानाने तेथे घेऊन जाण्याची तयारी सुरू केली आहे. त्याच बरोबर या स्पर्धेचे वेळापत्रक येत्या काही दिवसांत जाहीर होणार असून त्यात 60 सामन्यांचे आयोजन करण्यावर भर दिला जात आहे. सध्या तरी ब्रॉडकास्टर्स या कालावधीबाबत नाराज असले तरीही त्यांचे मन वळविण्यात बीसीसीआयला यश येईल, असेही संकेत मिळत आहेत. स्पर्धा जरी आखातात भरवली गेली व तिथे करोनाचा धोका अत्यंत अल्प असला तरीही स्पर्धा प्रेक्षकांना प्रवेश न देता रिकाम्या मैदानावरच खेळवली जाणार आहे.
त्यापूर्वी, सर्व संघाच्या खेळाडूंसाठी दोन आठवड्यांचे सराव सत्रही आयोजित करण्यात येईल. त्याचबरोबर तेथे दाखल झाल्यावर विलगीकरणाचा कालावधीही कमी राहावा यासाठी सध्या बीसीसीआयकडून अमिराती सरकारशी संवाद साधला जाणार आहे. स्पर्धेच्या आयोजनाबाबत बीसीसीआयकडून भारत सरकारकडे परवानगी मागितली जाणार आहे व त्यांच्या होकारानंतरच 26 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर हा कालावधी जाहीर केला जाईल.
धोनीचे पुनरागमन…
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएलद्वारेच स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. ही स्पर्धा करोनाच्या धोक्यामुळे लांबणीवर टाकली गेल्याने त्याचे पुनरागमन लांबले होते. आता स्पर्धा घोषित झाल्यावर तो चेन्नई संघाकडून मैदानात उतरेल. या स्पर्धेतील त्याची कामगिरी सरस झाली तर त्याचे भारतीय संघातील पुनरागमनही निश्चित मानले जाणार आहे.
गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर धोनीने आंतररष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. त्याने आयपीएलमध्ये कामगिरी सिद्ध केली तरच त्याला भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळेल, असे निवड समितीने सांगितले होते. मात्र, करोनाचा धोका वाढल्याने आयपीएल स्थगित झाली होती व त्यामुळे धोनीचे पुनरागमनही लांबले. आता आयपीएलच्या तारखा अधिकृतरीत्या जाहीर झाल्यावर धोनीचे मैदानावर अवतरणेही लक्षवेधी ठरणार आहे.