पृथ्वीच्या फक्त 5 किमी जवळून सुरू आहे प्रवास
रात्रीच्या वेळी आकाशात वायव्येकडे होणार दर्शन
– गायत्री वाजपेयी
पुणे – खगोलशास्त्रात विशेष रुची असणाऱ्या नागरिकांना एक दुर्मीळ अशी खगोलशास्त्रीय घटना पाहण्याची संधी मंगळवारपासून (दि.14) मिळणार आहे. खगोलशास्त्रज्ञांनी नव्याने शोधलेला “सी-2020 एफ3′ धूमकेतू पृथ्वीच्या अगदी जवळून पुढे सरकणार आहे. भारतीय नागरिकांना 20 दिवस धूमकेतू पाहता येणार आहे. रात्रीच्या वेळी आकाशात वायव्येकडे हा अनुभव घेता येणार आहे.
अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था “नासा’च्या “निओवाइस इन्फ्रारेड स्पेस टेलिस्कोप’ने मार्चमध्ये या धूमकेतूचा शोध लावला आहे. सध्या हा धूमकेतू पृथ्वीपासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे. तो अतिशय जवळून प्रवास करत जाणार असल्याने, उघड्या डोळ्यांनीदेखील पाहता येणार आहे, अशी माहिती भुवनेश्वर येथील पथानी समंता प्लॅनेटेरियमचे उपसंचालक सुभंदू पटनाईक यांनी दिली.
या धूमकेतूचा मध्यवर्ती भाग ज्या पदार्थांपासून बनला आहे, त्याचा संबंध आपल्या सूर्यमालेच्या उत्पत्तीच्या आधी सुमारे साडेचार कोटी वर्षे इतका सांगितला जात आहे. यानंतर असा धूमकेतू सुमारे सात हजार वर्षांनी दिसेल. त्यामुळे ही दुर्मीळ घटना अनुभवण्याची पर्वणी भारतीयांना मिळाली आहे.
दरम्यान, यापूर्वी सर्वांत स्पष्ट धूमकेतू उत्तर ध्रुव भागात 1986 मध्ये दिसला होता. त्याचा शोध हॅले नावाच्या शास्त्रज्ञाने लावला होता. म्हणून तो “हॅलेचा धूमकेतू’ म्हणूनही ओळखला जातो. दरम्यान, सध्या दिसत असलेला हा नवीन धूमकेतू हॅलेच्या धूमकेतूपेक्षाही अधिक स्पष्ट असल्याचे संशोधकांनी
म्हटले आहे.
धूमकेतू म्हणजे काय?
धूमकेतू म्हणजे उल्केसारखाच असणारा, पण बर्फापासून बनलेला केरसुणीसारखा दिसणारा खगोलशास्त्रीय पदार्थ आहे. धूमकेतू अतिलंबगोलाकार कक्षेत सूर्याभोवती फिरतात व फिरता-फिरता ते प्लुटोच्याही पुढे जातात. धूमकेतूंमध्ये घन कार्बन डायऑक्साइड, मिथेन, पाणी आणि इतर बरेच क्षार असतात. धूमकेतू अंतर्बाह्य अतिशय थंड व असुरक्षित असतो. धूमकेतू सूर्यापासून अतिदूर अंतरावर असलेल्या ढगांपासून तयार होतात, असे समजले जाते. असे ढग सौर अभ्रिकेपासून बनलेल्या घन कचऱ्यापासून तयार झालेले असतात, असे आतापर्यंतच्या संशोधनांतून समोर आले आहे.