ऑनलाइन शिक्षणासाठी चायनाच्या मोबाइलची खरेदी वाढली
नवी दिल्ली – करोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने सध्या ऑनलाइन शिक्षणपद्धतीवर भर दिला जात आहे. मात्र, यामुळे ग्राहकांची पावले मोबाइल खरेदीसाठी बाजारात वळत आहेत. कमी किमतीत जास्त सुविधा पुरविल्या जात असलेल्या मोबाइलची खरेदी वाढली असून त्यात चिनी बनावटीच्या मोबाइललाच सर्वाधिक पसंती मिळत आहे.
देशात करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने शाळा, महाविद्यालये अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. मात्र, शिक्षकांचे पगार तर द्यावेच लागत असल्याने देशातील शिक्षण संस्थांनी शिक्षकांना कामावर येण्याचे आदेश देत ऑनलाइन शिक्षणावर भर दिला आहे. यासाठी अद्ययावत स्मार्टफोन घ्यावे लागतात. जगभरात चीनचे स्मार्टफोन सर्वाधिक सुविधा देतात तसेच त्याची किंमतदेखील सर्वसामान्यांच्या आवाक्यात असते. त्यामुळे पालकदेखील बॉयकॉट चायना विसरून हेच मोबाइल खरेदी करण्याला पसंती देतात. किमान 6 ते 12 हजार या किमतीत हे मोबाइल उपलब्ध होतात, त्यामुळे त्याची खरेदी वाढल्याचेही दिसून आले आहे.
ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक असणारे साहित्य अनेकदा अनेकांकडे नसते. संगणक, लॅपटॉप यांच्यापेक्षा स्मार्टफोनला जास्त पसंती मिळत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत बोलावणे व त्यांना शिक्षण देणे अद्याप तरी शक्य झालेले नाही. तसेच सरकारदेखील याबाबत अद्याप आढावा घेत असल्याने ऑनलाइन शिक्षणाचे पेव देशभरात फुटले आहे.
पुढील काही महिन्यांमध्ये परिस्थिती सुधारली व शाळा सुरू झाल्या तर अत्यंत महागडे फोन विकत घेतले तर त्याचे पुढे करायचे काय, असा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळेच 6 ते 12 हजार रुपये किमतीच्या चिनी बनावटीच्या फोनची खरेदी वाढली आहे.