इस्लामाबाद: पाकिस्तान सरकारच्या मंजुरीने इस्लामाबादमध्ये सरकारी मदतीतून भगवान कृष्णांचे हिंदू मंदिर उभारले जात आहे. या मंदिराच्या स्थापनेला विरोध करणाऱ्या एकूण तीन याचिका तेथे दखल करण्यात आल्या होत्या, पण इस्लामाबाद हायकोर्टाच्या खंडपीठाने त्या तिन्ही याचिका फेटाळून लावल्या आहेत.
पाकिस्तानातील हिंदू पंचायत या संस्थेवर देशात कोणतीही बंदी नाही. त्यामुळे त्यांच्या प्रकल्पाला बंदी घालता येणार नाही, असे न्या. अमिर फारूख यांनी आपल्या निकालपत्रात म्हटले आहे. त्यांना मंदिर उभारणीसाठी सरकारने जागा दिली असली तरी हे मंदिर त्यांच्या स्वतःच्या खर्चातून उभे राहात आहे त्यामुळे ते बंद करता येणार नाही, असेही कोर्टाने म्हटले आहे.
इस्लामाबादमध्ये एच – 9 या प्रशासकीय विभागातील 20 हजार चौरस फूट जागेवर हे मंदिर उभे राहात आहे. या मंदिराचा पायाभरणी समारंभ नुकताच झाला आहे. मुस्लीम लीग (कायदे) या पक्षाने या मंदिराला विरोध करणारी याचिका दाखल केली होती. हा पक्ष सत्ताधारी आघाडीचा घटक पक्ष आहे.
इस्लमाबादेत हिंदू मंदिर उभे राहणे हे इस्लामच्या तत्त्वाला धरून नाही. त्यामुळे या मंदिर उभारणीवर बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडेही केली होती. दुसऱ्या एका याचिकेत या मंदिरासाठी सरकारने दहा कोटी रुपयांचा निधी दिला होता, असा दावा करण्यात आला होता.