मुंबई : मुंबईमध्ये पावसाने आणखी जोर धरला आहे. आज देखील मुंबईमध्ये हायअलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबईसह नवी मुंबई रायगड, पालघर, ठाणे या विभागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यातच आज साडेबारा वाजता हायटाईड देखील येण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत आज सकाळपासूनच पावसाने सुरुवात केली आहे. काल रात्री मुंबईला मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर आज देखील अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आज मुंबईत साडेबाराच्या सुमारास भरती येण्याची शक्यता आहे. सोबतच मुसळधार पाऊस देखील होणार असल्याने महापालिकेने 24 विभागांना दक्षतेचा इशारा दिला आहे.
काल दिवसभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबापुरीचा वेग मंदावल्याचं पाहिला मिळाले. हवामान खात्याच्या वतीने तीन दिवसांपूर्वी ऑरेंज अलर्ट जाहिर केला होता तर काल रेड अलर्ट जाहिर करण्यात आला होता. त्यानुसार मागील दोन दिवस मुंबईला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. काल रात्री 8.30च्या तब्बल 132 मिमी पावसाची नोंद हवामान खात्याने केली आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेलामुळे तलाव क्षेत्रात केवळ 7 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याचं दोन दिवसांपूर्वी समोर आलं होतं. परंतु आता शुक्रवार रात्रीपासूनच तलाव क्षेत्रात देखील पावसाने आपलं खातं उघडलं आहे. आज मुंबईत साडे बाराच्या सुमारास समुद्रात हाय टाईड येण्याची शक्यता आहे.