नवी दिल्ली: लडाखच्या पॅनगॉंग खोऱ्यात संघर्ष झालेल्या फिंगर क्षेत्रातील भूभाग चीनने आपल्या नकाशात दाखवला आहे. एवढेच नव्हे तर तेथे आपली चिन्हेही उभी केली आहेत. भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनी लष्कराचे हे कृत्य आगीत तेल ओतणारे ठरत आहे.
ही चिन्हे लांबीला 81 मिटर आणि रुंदीला 25 मिटर क्षेत्रात विखुरण्यात आली आहेत. हा सर्व भाग फिंगर चार आणि पाचच्या दरम्यानचा आहे. हा मॅनड्रीन चिन्ह आणि नकाशा एवढा मोठा आहे की त्याची छबी उपग्रहाने टीपली आहे.
चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने त्यांची हेलीपोर्ट पॅनगॉंग क्षेत्रातही विस्तारली आहेत. ही हेलीपोर्ट प्रत्यक्ष ताबा रेषेच्या आग्नेयेकडे 21 किलोमिटर्स वर उभारले आहे.
गलवान खोऱ्यापासून 176 किमी अंतरावरील शिनजिआंगमधील होतान येथील विमानतळ पुन्हा सुरू करण्यात आला असल्याचे 22 जूनच्या उपग्रहावरील छायाचित्रात दिसत आहे.
चीन भारतीय गस्ती पथकांना पिंगर चार ते आठ या क्षेत्रात फिरकू देत नाही. हा प्रकार मे महिन्याच्या सुरवातीपासून सुरू असल्याची माहिती हाती येत आहे. या भागात भारतीय जवान आणि चीनी सैनिक पाच मे रोजी भीडले होते. त्यात दोन्ही बाजूचे अनेक जण किरकोळ जखमी झाले होते.
या संघर्षानंतर चीनने आपल्या सैन्य दलात मोठी वाढ केली. गलवान खोरे आणि पॅनगॉंग तलाव भागात आपली बाजू भक्कम करण्यासाठी त्यांनी सुमारे 100 तंबू आणि बंकर्स उभारल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे.
भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी चर्चेची तिसरी फेरी पार पाडली. मंगळवारी सकाळी सुरू झालेली चर्चा तब्बल 11 तास सुरू होती.