भोर (वार्ताहर) – तालुक्यातील आंबवडे खोऱ्यातील नाझरे या एकाच गावात सहाजणांना करोनाने विळखा घातला आहे. येथे सहा करोना बाधित रुग्ण आढळल्याने भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी या विषयाची गंभीर दखल घेतली असून नाझरे व आंबवडे गांवात कंटेंन्मेंट झोन जाहीर केला आहे. गावात जाणारे मार्ग सील करुन पोलिस बंदोबस्तही वाढवला आहे.
शुक्रवारी (दि. 26) भोर शहरात करोना बाधित आढळलेल्या दोन रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले असताना व तालुका 100 टक्के करोनामुक्त होण्याच्या मार्गावर होता. नाझरे येथे तीन संशयीत करोना रुग्ण आढळले होते. त्यातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह तर दुसऱ्याचा निगेटिव्ह आला होता तर तिसऱ्याचा अहवाल फेर तपासणीसाठी पुणे येथे पाठवला होता. या तिघांच्या संपर्कात आलेल्या एकूण 27 जणांना भोर येथील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाइन करून त्यांचे स्वॅब पुणे येथे तपासणीसाठी पाठवले होते. त्याचे अहवाल आज (सोमवारी) आल.े यातील 5 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले असून नाझरे या एकाच गावात करोना बाधितांची संख्या 6 झाली असल्याचे भोर तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल तनपुरे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी सांगितले.
शिवरेच्या कंपनीत दोघे बाधित
या शिवाय पुणे – सातारा महामार्गावरील शिवरे येथील एका कंपनीत दोन करोनाबाधित रुग्ण आढळले. यातील एक हडपसर पुणे येथून तर दुसरा एक साताऱ्यावरून कंपनीत कामाला येत होता. त्यामुळे ते भोर तालुक्यात आढळले असले तरी त्यांची नोंद पुणे व सातारा येथे झाल्याचे सांगण्यात आले.