नागरिकांचा एकमुखी निर्णय
शहरातील एका व्यापाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह
म्हसवड (प्रतिनिधी) – म्हसवड शहरात मध्य वस्तीत 58 वर्षांच्या व्यापाऱ्याला नुकतीच करोनाची बाधा झाल्याने त्याच्या संपर्कामध्ये आलेल्या 15 नातेवाइकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या व्यापाऱ्याची शहरातील तिन्ही दुकाने बंद करण्यात आली असून म्हसवड शहर 14 दिवस बंद करण्याचा निर्णय प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान, या व्यापाऱ्याला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्यांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
हा व्यापारी म्हसवड येथील एका हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेला होता. त्या हॉस्पिटलमधील दोन कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. हा व्यापारी आपल्या कुटुंबासह बारामतीला गेला होता. तेथे त्याचा एका करोनाबाधित रुग्णाशी संपर्क आला. तेथून घरी आल्यावर त्याला लक्षणे जाणवू लागल्याने तो शहरातील एका हॉस्पिटलमध्ये गेला. तेथील डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांना माहिती दिली. त्यानंतर या व्यापाऱ्याला तपासणीसाठी कराड येथे पाठवण्यात आले. तेथे त्याच्या करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने म्हसवडमध्ये खळबळ उडाली आहे.
या व्यापाऱ्याची व नातेवाइकांची तीन दुकाने आहेत. हे सर्व कुटुंब एकत्र राहतात 12ते 13 लोकांचे कुटुंब आहे. गेल्या तीन-चार दिवसांमध्ये हा रुग्ण परिसरातील अनेकांच्या संपर्कात आल्याने शहरातील लोकांनी स्वयंस्फूर्तींने “जनता कर्फ्यू’ करण्याचा निर्णय बैठकीत एकमताने घेतला आहे. बैठकीस नगराध्यक्ष भगतसिंग वीरकर, नगरसेवक गणेश रसाळ, धनाजी माने, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार बाई माने, मुख्याधिकारी चेतना केरुरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर उपस्थित होते.