बारामती : धनगर समाजाबाबत आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणाऱ्या त्या तिघांवर बारामती तालुका पोलीस ठाण्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर आरोपी यांनी धनगर समाजाबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह विधाने केली. धनगर समाजाबाबत चुकीची विधाने करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी सकल धनगर समाजाने केली.
सकल धनगर समाजाचे कार्यकर्ते अभिजीत देवकाते, पांडुरंग कचरे, अमोल सातकर, निलेश धालपे, संपतराव टकले मेघराज नालंदे, सुरज चोपडे आदीं याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. मात्र पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी तक्रार घेण्यास नकार दिला. तक्रार घेण्याची विनंती केली असता सकल धनगर समाजातील कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक तुमच्यावर कारवाई करील असा सज्जड दम भरला. तक्रार देण्यासाठी गेलेल्या सकल धनगर समाजातील कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याकडे दुसऱ्या दिवशी केली. त्याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन धरले.
यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेरले त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.अखेर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी दिले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. अभिजीत अरविंद देवकाते (वय 3१) वर्ष राहणार निरावागज ता. बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रदीप खोब्रागडे, दीपक जाधव,सोपान धुमाळ या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि (24)रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गुन्हा घडला आहे.
आरोपी यांनी त्यांच्या नावाने असलेल्या फेसबुक अकाउंटवर धनगर जातीबद्दल आक्षेपार्ह कमेंट करून फिर्यादी यांच्या धार्मिक सामाजिक भावना दुखवुन समाजामध्ये तेढ निर्माण केली. त्यामुळे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.