नवी दिल्ली – देशावर कोरोना संकट ओढावल्याने गेल्या काही दिवसांपासून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी काही प्रमाणात का होईना पण थंडावल्या होत्या. मात्र आता गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या रक्तरंजित झटापटीनंतर राजकीय तोफा पुन्हा एकदा गरम झाल्या आहेत. गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सत्ताधाऱ्यांपुढे प्रश्नांची सरबत्ती केली. तर सत्ताधाऱ्यांनीही उलट प्रश्न विचारत विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
आरोप-प्रत्यारोपांच्या या मालिकेत आज भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काँग्रेसवर एक गंभीर आरोप केला आहे. नड्डा यांनी २००५ – २००६ मध्ये काँग्रेसला चीन प्रजासत्ताक व चीनी दूतावासाकडून डॉलर्समध्ये रक्कम मिळाल्याचा दावा केला असून याबाबतची माहिती एका नामांकित वृत्तसंस्थेने दिली आहे.
मध्य प्रदेश जनसंवाद या कार्यक्रमादरम्यान बोलताना नड्डा यांनी हा गंबीर आरोप केला असून, “२००५-२००६ सालात राजीव गांधी फाऊंडेशनला चीन प्रजासत्ताक व चीनी दूतावासाकडून ३ लाख यूएस डॉलर्स मिळाले. हेच तर चीन आणि काँग्रेसच्या गुप्त संबंधांचे द्योतक आहे.” असा आरोप त्यांनी लगावला.
I am amazed that the Rajiv Gandhi Foundation received 3 hundred thousand USD from the People’s Republic of China & the Chinese Embassy in 2005-06. This is the secret relation of Congress & China: BJP president JP Nadda during Madhya Pradesh Jan Samvad Rally via video conferencing pic.twitter.com/ArA513D0Xr
— ANI (@ANI) June 25, 2020
दरम्यान, भाजप अध्यक्षांच्या या आरोपांना काँग्रेसतर्फे काय उत्तर देण्यात येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.