जमैका – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला दोन वेळा चुकीने बाद दिले गेले, अशा शब्दात वेस्ट इंडिजचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच स्टिव्ह बकनर यांनी कबुली दिली. इतक्या वर्षांनी बकनर यांना एका रेडिओशी बोलताना ही उपरती सुचली.
खरेतर बकनर यांची जागतिक क्रिकेटमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट अम्पायर अशी ओळख होती. मात्र, कारकीर्दीच्या अखेरीस त्यांच्याकडून अनेकदा वादग्रस्त निर्णय दिले गेले. सचिनबाबत तर इंग्लंड, ऑस्ट्रेलियात त्यांनी दिलेले निर्णय खूप गाजले. त्यावर क्रिकेट समीक्षक, जाणकार, माजी खेळाडू तसेच खुद्द सचिननेही निवृत्तीनंतर खुलासे व टीका केल्या आहेत.
संपूर्ण कारकीर्दीत सचिनला मी दोन वेळा चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचे मला मान्य आहे. एकदा ऑस्ट्रेलियात सचिनच्या पॅडला चेंडू लागला होता. खरेतर हा चेंडू यष्ट्यांच्या खूप वरुन जात होता. मात्र, त्यावेळी मी त्याला पायचीत बाद दिले. त्यानंतर इंगलंडमध्ये एका सामन्यात त्याने हूक मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी बॅटला चेंडू लागलेला नसतानाही मी त्याला झेलबाद दिले. या सामन्याच्या वेळी मोठ्या संख्येने प्रेक्षक होते व त्यांचा खूप गलका सुरू होता, त्यामुळे मला बॅटला चेंडू लागल्याचे नीट समजून आले नाही. खरेतर एका पंचाने कबुली देणे योग्य नाही हे मला मान्य आहे, पण जे सत्य आहे ते मी नाकारत नाही, असे बकनर यांनी सांगितले.
क्रिकेटमध्ये पंचांना सोल जज म्हणत होते. त्यावेळी तिसरा पंच, व्हिडीओ रिप्लेची मर्यादा तसेच डीआरएस प्रणाली नव्हती त्यामुळे फलंदाजाला किंवा गोलंदाजाला दाद मागता येत नसे. आता या पद्धती क्रिकेटमध्ये आल्यामुळे निर्णयात अचूकता जास्त आली आहे. पंचदेखील एक माणूसच असतो व चुका माणसांकडूनच होतात. पंच म्हणून काम करत असताना खूप दडपण असते. एका निर्णयामुळे संपूर्ण सामन्याचे चित्र बदलू शकते. त्यावेळीही असेच झाले. सचिनला जेव्हा बाद दिले गेले तेव्हा त्याची मोठी खेळी होऊ शकली नाही. भारतीय संघाचेही सचिन बाद झाल्याने बरेच नुकसान झाले, पण त्यावेळी मला जे योग्य वाटले तसे निर्णय मी दिले, अशी सारवासारवही बकनर यांनी केली.