कोल्हापूर (प्रतिनिधी) – अडकूर (ता. चंदगड) येथील सेवासंस्थेत तब्बल 1 कोटी 46 लाखांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबतची फिर्याद चंदगड येथील लेखापरिक्षक नामदेव सरनोबत यांनी दिली आहे. या प्रकरणी विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, संचलिका, बॅंक निरिक्षकांसह एकूण 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अडकूर (ता. चंदगड ) येथील सेवा संस्थेतील सभासदांच्या खोट्या नोंदी व खोट्या सह्या करून कर्जरोखे न घेता पोकळ कर्ज नावे टाकण्यात आले आहे. त्यातून रोख शिल्लक कमी करून 50 लाख 94 हजार 850 रुपयांची उचल करण्यात आली. त्याशिवाय खोटे रेकॉर्ड तयार करून 67 लाख रुपये आणि सभासद कर्जाच्या येणे यादीमध्ये फरकाची रक्कम 28 लाख 10 हजार 497 रुपये 70 पैसे दर्शवून तो अपहार केला आहे.
या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष दत्तात्रय देसाई, संचालक जगन्नाथ इंगवले, संतू गुरव, नारायण इंगवले, सिध्दोजी देसाई, राजाराम घोरपडे, प्रकाश इंगवले, उत्तम चिलगोंडे, महादेव नाईक, मीना शिंदे, रंजना कबाडे, लिपिक कादर कोवाडकर, सचिव पुंडलिक घोळसे यांच्यासह जिल्हा बॅंकेचे शाखाधिकारी आनंदा कांबळे ( रा. हाळोली ता. आजरा ) जिल्हा बॅंक अडकूर शाखेचे निरिक्षक दादु हसन मुल्ला (रा. गडहिंग्लज ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सहाय्यक फौजदार जमादार पुढील तपास करत आहेत.