पतीची गेली होती नोकरी : ती कंपनीत होती कामाला
पुणे(प्रतिनिधी) – पोटगीबाबत पत्नीने दाखविलेल्या समजुतदारपणामुळे घटस्फोटाचा मार्ग मोकळा झाला. 20 फेब्रुवारी रोजी दोघांनी परस्पर संमतीने दाखल घटस्फोटासाठी केलेला अर्ज उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कौटुंबिक न्यायालय सुरू होताच चौथ्या दिवशी म्हणजे 11 जून रोजी मंजुर झाला. कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश गणात्रा यांनी हा आदेश दिला.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघांनी ऍड.आकाश मुसळे, अॅड. अमृता साळुंखे, अॅड. अश्विनी साळवे, अॅड. आनंद धोत्रे यांच्यामार्फत हा अर्ज केला होता. महाविद्यालयात असताना दोघांचे प्रेम जमले. 2017 मध्ये विवाह झाला. विवाहाच्यावेळी माधव चांगल्या ठिकाणी नोकरी करत होता. परंतु, काही कारणाने त्याची नोकरी गेली. तेव्हापासून तो नोकरीच्या शोधात होता. ती मात्र चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करत होती.
दरम्याच वैचारिक मतभेद असल्याने दोघांचे अजिबात पटत नव्हते. त्यांना अपत्य नव्हते. दोघेही एक वर्षांपासून विभक्तपणे राहत होते. पती नोकरीस नसल्याने त्याची आर्थिक परिस्थिती बरी नव्हती. तर, तिला चांगला पगार होता. यात पत्नीने सामंजस्याची भूमिका घेत पती नोकरीस नसल्याने पोटगी न घेण्याचा निर्णय तिने घेतला. अर्ज दाखल केल्यानंतर करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 8 जूनपासून कौटुंबिक न्यायालय सुरू झाले. लगेच हा निर्णय झाला.
याविषयी अॅड. आकाश मुसळे म्हणाले, नोकरी असो अथवा नसो पत्नीला सांभाळण्याची जबाबदारी पतीची आहे. त्यामुळे घटस्फोटाच्या प्रकरणात पोटगीवरून वाद होत असतात. मात्र, या प्रकरणात पत्नीने उदरनिर्वाहाकरिता पतीकडून पोटगी म्हणून मोठी रक्कम घेण्याच्या ट्रेंडला छेद देत समाजापुढे एक उत्तम आदर्श निर्माण केला.