पावणे तीन लाखांचा माल ताब्यात…
सोमेश्वरनगर (प्रतिनिधी) : सरकारी स्वस्त धान्य दुकानात गरिबांसाठी आलेला माल खुल्या बाजारात विक्रीला घेवून जाणारा टेम्पो बारामती-निरा मार्गावर होळ(ता. बारामती) येथे पकडण्यात आला. या टेम्पोसह २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या संकट काळात गरिबांच्या तोंडचा घास पळवुन नेत असल्याचा प्रकार जिल्ह्यातील बारामती तालुक्यात घडत असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई बारामतीच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे पथक आणि वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे यांनी संयुक्तपणे केली. याप्रकरणी वडगाव निंबाळकर येथील दुकानदार शशिकांत शहा आणि टेम्पोचालक शशिकांत कदम (रा. चोपडज) यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी (दि. १९) रोजी बारामती-निरा रस्त्यावर होळ गावच्या हद्दीत आठ फाटा येथे ही कारवाई करण्यात आली. या टेम्पोमधून (एमएच-४२, एम- ६३०८) १८ हजार ७०० रुपयांचा १७ पिशव्या गहू, ५२ हजार ५०० रुपये किमतींचा ३५ पिशव्या तांदूळ भरून तो खुल्या बाजारात विक्रीसाठी नेला जात होता. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याकडे यासंबंधीच्या तक्रारी गेल्या होत्या. त्यानुसार सापळा रचून हा टेम्पो पकडण्यात आला.
नायब तहसीलदार महादेव भोसले यांच्या उपस्थितीत हा माल रेशनिंगचा असल्याची खात्री करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, गाव कामगार तलाठी रवींद्र कदम, कोतवाल बाळासो कर्चे आदींनी पंचनामा करत माल ताब्यात घेतला आहे.