जम्मू – या वर्षभरात 10 जूनपर्यंत जम्मू काश्मीरमध्ये ताबारेषेवर पाकिस्तानकडून तब्बल 2027 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. 2019 मधील शस्त्रसंधीच्या उल्लंघनांपेक्षा या वर्षीचे प्रमाण तब्बल 69 टक्क्यांनी जास्त आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाकिस्तानी हद्दीतून भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना फायदा व्हावा, म्हणूनच हे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात असल्याचे वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांचे मत आहे. यापूर्वी 2019 मध्ये एकूण 3,168 वेळा तर 2018 मध्ये 1,629 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते.
यावर्षभरात 10 जूनपर्यंत जितक्या वेळेस शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले त्यात मार्च महिन्यात सर्वाधिक 411 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले होते, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर्षी जानेवारीमध्ये 367, फेब्रुवारी 366, एप्रिल 382 आणि मे महिन्यात 382 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले होते. तर जून महिन्याच्या पहिल्या 10 दिवसात 114 वेळा पाकिस्तानी सीमेवर गोळीबार केला होता.
या उलट 2019 मध्ये याच कालावधीमध्ये 926 वेळा सीमेवर गोळीबार झाला होता. तर मार्चमध्ये 267, एप्रिलमध्ये 234, मेमध्ये 203 आणि जूनच्या पहिल्या 10 दिवसात 60 वेळा सीमेवर गोळीबार झाला होता. या गोळीबाराच्या आडून दहशतवाद्यांचे काही गट जम्मू काश्मीरमध्ये घुसल्याचे जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले आहे.