रायपूर – माओवाद्यांचे समर्थक असल्याच्या आरोपावरून भाजपच्या एका स्थानिक नेत्याला आणि आणखी एका व्यक्तीला छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्हा पोलिसांनी अटक केली आहे. जगत पुजारी आणि रमेश उसेन्डी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
कट्टर नक्षलवाद्यांच्या वाहतुकीसाठी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पुजारी हे बारसूर गावचे रहिवासी असून भाजपच्या दंतेवाडा जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत, असे पोलीस अधिक्षक अभिषेक पल्लावा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
अभुजमाड या नक्षलवाद्यांच्या तळावरील कट्टर नक्षलवाद्यांची मदत केल्याचे समजल्यावर पोलिसांनी कसून तपास केला. मोबाईल फोनवरील संभाषणाच्या आधारे पोलिसांनी पुजारीसह अन्य काही संशयितांवर बारीक लक्ष ठेवले होते.
नक्षलवाद्यांच्या वाहतुकीसाठी 4 लाख रुपयांना ट्रॅक्टर खरेदी केल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी उसेन्डी आणि पुजारी यांना अटक केली. नक्षलवाद्यांना वेळोवेळी हवी ती मदत करत असल्याचे पुजारीने मान्य केले आहे.