लॉस एंजल्स – हवेमुळे करोना विषाणूचा होणारा प्रसार अधिक संसर्गजन्य आणि वेगाने प्रसारास कारणीभूत ठरू शकतो. एका संशोधनात या महामारीच्या तीन प्रमुख केंद्रांत या विषाणू प्रकोपाचे आकलन केले आहे.
रसायनशास्त्रातील 1995चे नोबेल विजेते मारियो जे मोलिना यांच्यासह काही शास्त्रज्ञांनी या महामारीचे तीन केंद्र असलेले चीनमधील वुहान, अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि इटलीमध्ये संसर्गाचे स्वरूप आणि नियंत्रण यासाठी उचलण्यात आलेली पावले याचे आकलन करून कोविड-19च्या प्रसाराच्या मार्गांचे संशोधन करण्यात आले.
संशोधनकर्त्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे की, जागतिक आरोग्य संघटना अनेक दिवसांपासून फक्त करोना विषाणूग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळेच संसर्ग होण्याच्या प्रसाराला रोखण्यासाठी जोर देत आहे. मात्र, करोना विषाणूचा हवेच्या माध्यमातून होत असलेल्या प्रसाराकडे दुर्लक्ष करीत आहे. या संशोधनातून त्यांनी सांगितले की, हवेमुळे होणारा प्रसार अधिक संसर्गजन्य आहे, त्यामुळे करोना प्रसारास हेही एक महत्त्वाचे माध्यम आहे.
त्यांनी म्हटले आहे की, साधारणतः श्वास घेण्याच्या क्रियेमुळे विषाणू शरीरात प्रवेश करतो. सूक्ष्म धुलीकण किंवा हवेतील ओलावा यामुळे हा विषाणू प्रवास करू शकतो. एखाद्या विषाणूग्रस्त व्यक्तीचा खोकला किंवा शिंक यामुळे विषाणूचा वेगाने प्रसार होतो.
संशोधन कर्त्यांनुसार अमेरिकेत लागू असलेले सोशल डिस्टन्सिंगचा उपाय पुरेसा नाही.
या संशोधनातून समोर आले आहे की, कोविड-19 या जागतिक महामारीला रोखण्यात आतापर्यंत यश आले नाही कारण हवेमुळे करोना विषाणू प्रसाराकडे गंभीरपणे पाहण्यात आलेले नाही. या संशोधनातून निष्कर्ष काढण्यात आला आहे की, सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावून विषाणूच्या प्रसाराला रोखण्यात बरीच मदत होऊ शकते.