राज्यशासनाकडे मागणी : आरोग्य विभागासाठी 77 कोटी रुपयांची गरज
पुणे – शहरातील करोनाची साथ रोखण्यासह, आरोग्य यंत्रणा सक्षम करणे आणि बाधितांच्या उपचारांचा खर्च करण्यासाठी महापालिकेने राज्य शासनाकडे 100 कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यात, सर्वाधिक 77 कोटींचा खर्च आरोग्य विभाग सक्षमीकरणासाठी आहे. याशिवाय अन्य खर्चाचा यात समावेश आहे.
दोन आठवड्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्मार्ट सिटीच्या बैठकीत महापालिकेस उपचारासाठी आवश्यक निधी राज्यशासनाकडून दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार, महापालिकेने याबाबतचे पत्र शासनास पाठवल्याचे अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी सांगितले आहे.
सध्या महापालिकेकडून बाधितांसाठी बेड, विलगीकरण कक्ष, औषधे, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा साधने, अन्नधान्य पुरवठा, तसेच इतर खर्च केले जात आहेत. याशिवाय रुग्णवाहिका, बाधितांची वाहतूक, मृतांवर अंत्यसंस्कार यासाठीही महापालिकेस मोठा खर्च करावा लागत आहे. त्यातच आर्थिक उत्पन्नही घटलेले असून जीएसटी अनुदानही अवघे 50 कोटी मिळत आहे. ही बाब लक्षात घेऊन करोना प्रतिबंधासाठी पालिकेने आतापर्यंत सुमारे 50 कोटींहून अधिक खर्च केला असून, तो आणखी वाढणार आहे.